पश्चिम बंगालमध्ये सिद्दीकी यांच्याशी युतीमुळे आनंद शर्मा संतप्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना काँगेसची अवस्था मात्र अधिकाधिक बिकट होताना दिसत आहे. पक्षातील 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षनेतृत्वासमोर आव्हान उभे केले असून आता मतभेदांमध्ये अधिकच वाढ होत आहे. पश्चिम बंगालमध्ये पीरजादा सिद्दीकी यांच्या इंडियन सेक्युलर प्रंट या नवस्थापित पक्षाशी काँगेसने युती केल्याने माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा संतप्त झाले आहेत. सिद्दीकी यांच्यासारख्या धर्मवादी नेत्याशी युती करणे ही काँगेसच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीशी प्रतारणा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सिद्दीकी यांनी आपला राजकीय पक्ष नुकताच स्थापन केला आहे. या पक्षाचा राज्यातील मुस्लीम बहुल मतदारसंघांमध्ये प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तो लक्षात घेऊनच काँगेसने अल्पसंख्याकांच्या मतपेटीचे राजकारण साधण्यासाठी या धर्मवादी मानल्या गेलेल्या पक्षाशी युती केली असा आरोप होत आहे. त्यामुळे काँगेसचे ज्येष्ठ नेते संतापले असून त्यांनी पक्षाला जाब विचारला आहे. काँगेस पक्षाचा आत्मा गांधीवादी आणि नेहरूवादी विचारसरणीचा असून सर्व धर्मांना न्याय देणारा धर्मनिरपेक्षता वाद ही काँगेसची विचारसरणी आहे. काँगेस आता राजकीय लाभाच्या मोहापायी या विचारसरणीपासून दूर होत आहे. धर्मवादी पक्षांशी किंवा संघटनांशी लढताना काँगेस पक्षपाती धोरण अवलंबू शकत नाही, असे आनंद शर्मा आणि इतर काँगेस नेत्यांचे म्हणणे आहे.
नेतृत्वावरच शरसंधान
आनंद शर्मा यांनी काँगेस नेतृत्वावरच उघड हलाबोल केला. आम्ही काँगेसचे जुने जाणते नेते आहोत. आम्ही पक्षात केवळ प्रसिद्धीसाठी किंवा ‘चमकोगिरी’ करण्यासाठी आलेलो नाही. आमची जडणघडण काँगेसच्या छत्राखालील विद्यार्थी आंदोलन आणि युवक चळवळीतून राजकारणात आलो आहोत, असे उद्गार काढून त्यांनी आपली व्यथा तीव्रपणे एका कार्यक्रमात व्यक्त केली.
10 वर्षात काँगेस विकलांग
गेल्या 10 वर्षांमध्ये काँगेसची अवस्था दयनीय झाली आहे. आता तर काँगेसची धर्मवादी पक्षांशी युती करण्यापर्यंत मजल गेली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीही आम्ही पक्षाला इशारा दिला होता. पण तो मानला गेला नाही. त्यामुळे काँगेसचा दारूण पराभव झाला. पक्षनेतृत्व अनुभवातून शिकत नाही, अशा अर्थाची तक्रार शर्मा यांनी केली. गुलाम नबी आझाद, मनीष तिवारी, राज बब्बर, कपिल सिबल आदी नेत्यांनीही असेच विचार व्यक्त केले आहेत.