अवैध मायनिंगला दणका : कासार्डे-पियाळी परिसरातील मशीनही सील
प्रतिनिधी / कणकवली:
कासार्डे परिसरात अवैध सिलिका उत्खनन व वाहतूकप्रश्नी महसूल विभागाने कारवाईचे पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यात मोजमापे घेण्यात आलेल्या चार जमीन मालकांना तब्बल 3 कोटी 40 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर कासार्डे-पियाळी भागातील एका अनधिकृत वॉशिंग प्लांटवरील मोटरही सील करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली. दरम्यान, या कारवाईमुळे अवैध सिलिका मायनिंगवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
कासार्डे परिसरात होत असलेल्या अवैध मायनिंगबाबत प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार महसूलच्या पथकाने गेल्या आठवडय़ात चार प्लांटधारकांनी उत्खनन केलेल्या अवैध मायनिंगबाबत मोजमापे घेतली होती. त्यावर संबंधित जमीनमालकांना बोलावून सुनावणीही झाली होती. तर प्रांताधिकाऱयांनी तपासणी तसेच मोजमापे घेण्यासाठी महसूलचे पथकही नियुक्त केले होते.
3 कोटी 40 लाख दंड
त्यानुसार मोजमापे घेण्यात आलेल्या चारही जमीन मालकांच्या जागेत अनधिकृत सिलिका उत्खनन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार चौघांना मिळून 3 कोटी 39 लाख 68 हजार 704 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यात एका जमीनमालकाला 1 कोटी 44 लाख 50 हजार 656, दुसऱयाला 1 कोटी 20 लाख 13 हजार 584, तिसऱयाला 40 लाख 90 हजार 416, तर चौथ्याला 34 लाख 14 हजार 48 रुपये दंड करण्यात आला आहे.
एक वॉशिंग प्लांट सील
कासार्डे-पियाळी भागात सरू असलेल्या एका अनधिकृत वॉशिंग प्लांटबाबत तहसीलदारांकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे मंगळवारी तहसीलदार आर. जे. पवार, महसूल नायब तहसीलदार एस. व्ही. राठोड, मंडळ अधिकारी विद्या जाधव, नांदगाव तलाठी अलकुडे, जानवली तलाठी श्रीकांत जाधव यांच्या पथकाने जागेवर जाऊन तपासणी केली. यावेळी हा प्लांट अनधिकृत असल्याचे दिसून आले. तसेच पाणी उपसा परवानगीही घेण्यात आली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या प्लांटवरील मोटरसह मशिनरी सील करण्यात आली असल्याचे तहसीलदार पवार यांनी सांगितले.
पथकामार्फत होणार मोजमापे
दरम्यान, महसूल विभागाच्या पथकाकडून कासार्डेसहीत फोंडा व इतर भागातही होत असलेल्या अनधिकृत उत्खननाबाबतची तपासणी महसूल विभागाच्या पथकाकडून करण्यात येऊन मोजमापे घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे. मोजमापे घेऊन दंडात्मक कारवाई करण्यासोबतच अनधिकृत वॉशिंग प्लांटही सील केले जाणार आहेत. तसेच तपासणी पथकाच्या माध्यमातून चेकपोस्टवर दिवसरात्र तपासणी केली जाणार असल्याचे समजते. महसूल विभागाने अनधिकृत सिलिका मायनिंगबाबत कारवाईची पावले उचलल्यानंतर आता अशाप्रकारे अनधिकृत उत्खनन करणाऱयांमध्ये मोठी खळबळ उडाली असल्याचे दिसत आहे.