भाजपच्या प्रचाराला वेग – सप, राजद बॅनर्जींसोबत
कोलकाता / वृत्तसंस्था
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभांच्या निवडणुकांची घोषणा करताच पश्चिम बंगालमध्ये प्रचाराने आणि युत्यांच्या राजकारणाने वेग घेतला आहे. भारतीय जनता पक्षाने मंगळवारी राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेऊन तृणमूल काँगेस आणि ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली. दुसरीकडे समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाने तृणमूल काँगेसशी युती करण्याची घोषणा केली.
राज्यात 27 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत आठ टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजप स्वबळावर निवडणुका लढवत असून काँगेस आणि डाव्या पक्षांनी युती केली आहे. तर तृणमूल काँगेसने सम आणि राजदशी युती करून लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात विधानसभेच्या 294 जागा आहेत.
कोतवाली भागावर लक्ष
राज्यात प्रामुख्याने भाजप आणि तृणमूल काँगेस यांच्यातच लढत होईल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष कंबर कसून प्रचाराला लागले आहेत. मालदा या जिल्हय़ावर दोन्ही पक्षांचे लक्ष आहे. या जिल्हय़ातील कोतवाली भागात भाजपने मंगळवारी प्रचार मिरवणूक काढली. तसेच भाजपच्या नेत्यांनी स्थानिक नागरीकांबरोबर भोजनाचा आस्वादही घेतला. तृणमूल काँगेस नेत्यांनीही या जिल्हय़ात अन्यत्र प्रचार करून मतदारांशी संपर्क साधला. सप आणि राजद हे वास्तविक काँगेसच्या आघाडीत आहेत. तथापि, त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी संधान बांधले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालपुरती ही आघाडी तुटली आहे. बॅनर्जी जितक्या जागा देतील तितक्या आम्हाल मान्य असतील असे विधान राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केले आहे.