तज्ञांचे मत, सरकार काय करणार याची उत्सुकता
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलमधून जे उत्पन्न अपेक्षित धरले आहे, ते कमी न होता, या दोन्ही जीवनावश्यक वस्तूंचे दर 6 ते 8 रूपयांनी कमी होऊ शकतात, असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे. तथापि, सरकार आता काय पावले उचलणार याकडे साऱयांचे लक्ष लागले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या करांमधून येत्या 2021-2022 या आर्थिक वर्षात 3.2 लाख कोटी रूपये मिळतील, अशी अपेक्षा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मात्र, सध्याचे या दोन्ही वस्तूंवरील कर लक्षात घेता केंद्र सरकारला 4.35 लाख कोटी रूपयांचे उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे आपल्या अपेक्षित उत्पन्नात घट होऊ न देताही केंद व राज्य सरकारे या दोन्ही वस्तूंचे दर 6 ते 8 रूपये प्रतिलीटरने कमी करू शकतात, असे म्हणणे या तज्ञांनी मांडले आहे.
या वस्तूंचे दर कमी करण्यावर केंद्राचा विचार सुरू असून राज्यसरकारांशीही चर्चा सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. त्या माहितीला अनुसरून तज्ञांनी सरकारला काही सूचना केल्या आहेत. तथापि, केंद्र किंवा राज्य सरकारे एकदम इतक्या मोठय़ा प्रमाणात दर कपात करण्याची शक्यता नसल्याचेही मत व्यक्त होत आहे. किमती जशा टप्प्याटप्प्याने वाढविल्या तशा त्या टप्प्याटप्प्यानेच कमी होतील असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दर एकदम कमी होण्याची अपेक्षा करता येणार नाही, असाही विचार तज्ञांकडून व्यक्त होत आहे.