रोममधील मानांकन कुस्ती स्पर्धा – कुलदीप मलिकला कांस्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रोममध्ये सुरू असलेल्या मॅटेव पेलिकोन मानांकन मालिकेतील कुस्ती स्पर्धेत भारताच्या सरिता मोरने रौप्य तर पुरुष विभागात कुलदीप मलिकने कांस्यपदक पटकावले.
भारताने शुक्रवारी ग्रीको रोमन प्रकारात तीन पदके मिळवित एकूण पदकसंख्या पाचवर नेली आहे. आशियाई चॅम्पियन असलेल्या सरिता मोरने 57 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत कझाकच्या अल्टीने सॅटील्गनवर 4-1 अशा गुणांनी मात करून उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत तिने एम्मा तिसिनाला चीतपट करून किमान रौप्यपदक निश्चित केले होते. पण अंतिम फेरीत सरिताला बल्गेरियाच्या गुलिया पेनल्बरकडून 2-4 अशा गुणफरकाने पराभव स्वीकारावा लागल्याने तिला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. याच वजन गटात भारताच्या अंशू मलिकला उपांत्य फेरीत गुलिया पेनल्बरकडून 7-10 अशा गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. कांस्यपदकासाठी तिची लढत इटलीच्या फ्रान्सेस्का इंडेलिकॅटोशी होणार होती. पण दुखापतीमुळे तिने या लढतीतून माघार घेतल्याने अंशूची कांस्य मिळवण्याची संधीही हुकली. गेल्या वर्षी तिने या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
68 किलो वजन गटात भारताच्या निशाला पात्रता फेरीतच बल्गेरियाच्या मिमी ऱहीस्टोव्हाकडून 3-10 अशी हार पत्करावी लागली. त्यानंतर रेपेचेग लढतीतही तिला अमेरिकेच्या अलेक्झांड्रिया जुनिस ग्लॉडकडून 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला. 76 किलो गटात कझाकच्या एल्मिरा सीडीकोव्हाने उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या किरणवर 10-3 अशी एकतर्फी मात केली.
पुरुष विभागात कुलदीप मलिकने 2014 चा वर्ल्ड चॅम्पियन रशियाच्या चिंगीझ लॅबाझॅनोव्हवर 10-9 अशी निसटती मात करीत कांस्यपदक निश्चित केले. त्याआधी त्याला पहिल्या लढतीत युरोपियन चॅम्पियन तुर्कीच्या सेलकुक कॅनकडून पराभव पत्करावा लागला होता. गेल्या वर्षी येथे सुवर्ण मिळविलेल्या भारताच्या गुरप्रीत सिंगला 82 किलो गटाच्या पात्रता लढतीतच अमेरिकेच्या रिचर्ड पर्किन्सकडून 11-12 असा पराभवाचा धक्का बसला तर याच वजन गटात हरप्रीत सिंगला पात्रता फेरीतूनच बाहेर पडावे लागले. तुर्कीच्या सालिह आयदिनने त्याला हरविले.