वृत्तसंस्था/ नागपूर
भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने चमकदार प्रदर्शन करीत जर्मनीच्या पॅट्रिक फ्रान्सिस्काला पराभवाचा धक्का देत वर्ल्ड टेबल टेनिस स्टार कन्टेन्डर दोहा स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. साथियान व मनिका बात्रा यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत 32 व्या स्थानावर असणाऱया अचंता शरथ कमलने जागतिक सोळाव्या मानांकित फ्रान्सिस्कावर चुरशीच्या लढतीत 12-10, 3-11, 11-7, 7-11, 11-9 अशी मात करीत आगेकूच केली. त्याची पुढील लढत अहमद सालेह व जर्मनीचा दिमित्रिज ओवचॅरोव्ह यापैकी एकाशी होईल. जी. साथियान व मनिका बात्रा यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. मनिकाला जपानच्या जागतिक तिसऱया मानांकित मिमा इटोने 11-7, 11-6, 11-7 असे हरविले तर साथियानला जपानच्याच जागतिक पाचव्या मानांकित टोमोकाझू हारिमोटोकडून 4-11, 5-11, 8-11 असा पराभव स्वीकारावा लागला.