शाहूपुरी पोलिसांची कारवाई – मोती चौक, मंगळवार पेठेत मोठे फ्लेक्स
प्रतिनिधी/ सातारा
सध्या एखाद्या पेठेतील उद्योन्मुख दादा, भाईचा वाढदिवस म्हटले की भला मोठा फ्लेक्स लावण्याची फॅशन रुढ झाली. मात्र, हे करताना त्याची परवानगी घ्यावी लागते हे माहिती असूनही बघू कोण करतंय, अशा अर्विभावात मंगळवार पेठेत तसेच मोती चौकात भला मोठा फ्लेक्स लावणाऱया व फ्लेक्स तयार करणाऱयासह साताऱयातील बाराजणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार तळे परिसरात आंब्याच्या झाडाजवळ मोठा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा फलक झळकत होता. ही बाब निदर्शनास आल्यावर पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी माहिती घेण्याच्या सूचना केल्या होत्या. पोलीस ठाण्याकडून फलक लावणाऱयांची माहिती घेवून फोन केला असता त्यांनी फ्लेक्स लावण्यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयाची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. त्यानंतर मग पोलिसांनी मंगळवार पेठेत फ्लेक्सप्रकरणी निलेश चंद्रकांत चोरगे (वय 26), विनय नारकर (वय 27), देवेंद्र ढाणे (वय 28) सर्व रा. मंगळवार पेठ, सातारा व शिवतेज गुजर (वय 25 रा. जकातवाडी, ता. सातारा) तसेच मोती चौकातील फ्लेक्सप्रकरणी विरेंद्र ढोणे, यश ढोणे, पराग निवळे, किरण कोळी, विकास कारंडे, अभिषेक नारकर, यश जांभळे व फ्लेक्स तयार करणारा सचिन दत्तात्रय गायकवाड यांनी सार्वजनिक ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता मोठे फ्लेक्स लावून शहराच्या सौंदर्यास बाधा आणल्याचे कृत्य केले असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस नाईक वर्षाराणी शिंदे यांनी तक्रार दिली असून पोलीस हवालदार गाढवे या गुन्हय़ाचा पुढील तपास करत आहेत.