प. पू. सिद्धराम स्वामीजींच्या हस्ते भूमिपूजन
वार्ताहर / कडोली
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या कडोली येथील श्री दूरदुंडेश्वर विरक्त मठाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी सोडलेला आहे. तो पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून मठाची कीर्ती आणि ख्याती अशीच सर्वदूर पसरत ठेवावी, असा उपदेश गदग डंबल नागनूरचे श्री म. नि. जगद्गुरु डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामीजी यांनी केला.
येथील श्री दूरदुंडेश्वर विरक्त मठाच्यावतीने आयोजित श्री महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने नियोजित मंदिर भूमिपूजन कार्यक्रमात पूज्य श्री सिद्धराम महास्वामी उपदेश करताना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कडोली येथील श्री दूरदुंडेश्वर मठाची महती असून हे जागृत देवस्थान आहे. याची प्रचिती सर्वांना आलेली आहे. या मठाचे भक्तजण सर्वदूर पसरले आहेत. या मठाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. तेव्हा आता मठाची नवीन वास्तू उभारून संपूर्ण पंचक्रोशीतील भक्तजणांचे भक्तीकेंद्र बनावे यासाठी प्रयत्न व्हावेत, असेही स्वामींनी सांगितले.
या नूतन मंदिराच्या कळसाचे काम पूर्ण करण्यासाठी भरीव आर्थिक मदत देत असलेले कडोली गावचे सुपूत्र आणि मुंबई-ठाणे येथे स्थायिक असलेले सुप्रसिद्ध चार्टर्ड अकौंटंट चंद्रकांत आप्पया केदारी यांनी बोलताना सांगितले की, कडोली येथील श्री दूरदुंडेश्वर मठ एक जागृत मठ म्हणून प्रसिद्ध असून याची प्रचिती मला आलेली आहे. साधू-संतांची संगत केल्यास मनशांती मिळते आणि आपले जीवन सफल होते. याप्रसंगी मंदिराचे भूमिपूजन केलेले यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी, माजी आमदार संजय पाटील, बेळगाव कारंजी मठाचे म. नि. जगद्गुरु गुरुसिद्ध महास्वामी आणि श्री दूरदुंडेश्वर विरक्त मठाचे पूज्य श्री गुरुबसवलिंग स्वामीजी यांनीही उपदेश केला.
प्रारंभी श्री दूरदुंडेश्वर इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागतगीत म्हटल्यानंतर किशोर पाटील यांनी मठाच्यावतीने व्यापीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि प्रास्ताविक भाषणात मठाची महती सांगितले.
विविध कार्यक्रम
महाशिवरात्रीचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे यावर्षीही कुस्ती, जनावरांचे प्रदर्शन, आरोग्य शिबिर तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कुस्ती स्पर्धेत बेळगाव तालुक्यातील लहान-थोर पैलवान बंधूंनी सहभाग घेऊन चटकदार कुस्त्या केल्या. विजेत्यांना योग्य बक्षिसे देऊन त्यांना सर्वांनी प्रोत्साहित केले.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जनावरांचे प्रदर्शन आणि कृषी वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात शेळी, मेंढी, गाय, वासरू, बैल, म्हैस अशा सुमारे 150 लहान-थोर जनावरांनी भाग घेतला होता. यावेळी विविध जातीच्या जनावरांची निवड करून बक्षिसे देण्यात आली.
शिवाय मठाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कडोली पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी याचा लाभ घेतला. महाशिवरात्रोत्सवाच्या सांगता समारंभात विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. शिवाय मठाच्यावतीने नूतन ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
‘पालवा’ आकर्षणाचे केंद्र जनावरांच्या प्रदर्शनात ‘वृषभ’ जातीचा आणि 100 हून अधिक किलो वजनाचा पालवा सहभागी झाला होता. केवळ अडीच वर्षाचा हा पालवा काकती येथील सिद्राय रामा अष्टेकर यांचा आहे. हा पालवा या प्रदर्शनाचा केंद्रबिंदू ठरला होता. हा पालवा पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती.