ऑनलाईन-मोबाईल वॉलेटचा वापर वाढला : नागरिकांकडून एटीएमचाही वापर
प्रतिनिधी / बेळगाव
खासगीकरणाविरोधात बँक संघटनांनी सोमवार व मंगळवार असे दोन दिवस संप पुकारला आहे. त्यातच दुसरा शनिवार व रविवारची साप्ताहिक सुटी आल्याने सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. यामुळे आर्थिक व्यवहार करण्यासाठी नागरिकांनी डिजीटल व्यवहारांना पसंती दिली आहे. ऑनलाईनसोबतच मोबाईल वॉलेटचा वापर करून आर्थिक व्यवहार केले जात आहेत.
बँकाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव असल्याने बँक कर्मचारी संघटनांनी त्याला जोरदार विरोध केला आहे. दोन दिवस देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. साप्ताहिक सुटय़ा जोडून आल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे डिजीटल व्यवहारांशिवाय नागरिकांना पर्याय नाही.
मार्च अखेरमुळे नागरिकांची धावपळ
आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे मार्च महिना. या महिन्यात प्रत्येक कंपनीचा वार्षिक अहवाल काढण्यात येतो. त्यामुळे बँकांमध्ये ये-जा सुरू असते. कर्जदारांचीही या महिन्यात धावपळ सुरू असते. परंतु बँका सलग बंद असल्याने या सर्वांना याचा फटका बसला. अशा ग्राहकांना बुधवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. खासगी बँकांमध्ये मात्र व्यवहार सुरळीत सुरू होते.
मोबाईल वॉलेटचा वापर वाढला
सलग चार दिवस बँका बंद असल्याने नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी मोबाईल वॉलेट तसेच एटीएमवर अवलंबून राहावे लागले आहे. एटीएममधून पैसे काढतानाही मर्यादा येत असल्याने अनेक अडचणी येत आहेत. काही एटीएममध्ये चलन नसल्याने ‘नो कॅश’ म्हणून बोर्ड दर्शविले जात आहेत.
याचसोबत भीम ऍप, पेटीएम, फोन पे, गुगल पे, एअरटेल पे अशा मोबाईल वॉलेट ऍपच्या साहाय्याने रक्कम पाठविणे ग्राहकांना सोयीचे ठरू लागले आहे.