बॅ. नाथ पै सेवांगणच्या कौटुंबिक सल्ला केंद्राचा उपक्रम
कुटुंबियांकडून महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त
वार्ताहर / मालवण:
येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित कौटुंबिक सल्ला केंद्र, मालवणतर्फे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘माझ्या घरची सावित्री’ हा अभिनव कार्यक्रम बॅ. नाथ पै सेवांगण येथे झाला. कार्यक्रमात कुटुंबाचा आधार होणाऱया अकरा महिलांचा सन्मान करण्यात आला. कुटुंबियांनी महिलांविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त करीत महिलांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाला बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर, मंगल परुळेकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबेरकर, शैलजा पाटील तसेच पदाधिकारी, कर्मचारी, सेवांगण परिवार उपस्थित होता. लक्ष्मी अवसरे, रझिया शेख, प्रभावती वाडकर, मधुमती शिरगावकर, मेघा सावंत, आकांक्षा शिरपुटे, पूजा मालवणकर, किर्ती आचरेकर, अनिता आळवे, तेजस्विनी पाताडे, जस्मिनी पराडकर या अकरा महिलांचा सेवांगण परिवारातर्फे सन्मान करण्यात आला. सन्मानप्राप्त महिलांच्या कुटुंबातील सदस्यांनी महिलांच्या कार्याचे कौतुक केले. कठीण परिस्थितीतही घरातील महिला डगमगत नाहीत, तर त्या धीरोदात्तपणे संकटांचा सामना करतात. त्यामुळे घरातील महिला कुटुंबासाठी आधार बनल्या आहेत, अशा भावना कुटुंबियांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे आयोजन कौटुंबिक सल्ला केंद्राचे मनोजकुमार गिरकर, आदिती कुडाळकर, निरंजन अवसरे व सल्लागार समितीने केले होते. प्रास्ताविक ज्योती तोरसकर यांनी केले. सुत्रसंचालन गार्गी ओरसकर यांनी, तर आभार मनोजकुमार गिरकर यांनी मानले.