बार्शी / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण बार्शी तालुक्यामध्ये असून आता बार्शी पुन्हा एकदा कोरोनाच्या लढाईसाठी तयार करावयाची आहे. हे आव्हान बार्शी तालुक्यातील सर्व प्रशासन यशस्वी पेलणार असा विश्वास व्यक्त करत बार्शी कोरोना मुक्त करण्यासाठी आज प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी नवीन नियमावली जाहीर केली. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी कोरोना आढावा च्या बैठकीमध्ये ते बोलत होते. या बैठकीस मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री उदार, नायब तहसीलदार संजीवन मुंडे तहसीलदार सुनील शेरखाने तालुका आरोग्य अधिकारी संतोष गायकवाड आदी मान्यवर व बार्शी शहरातील सर्व व्यापारी व इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग बार्शी तालुक्यामध्ये झपाट्याने वाढत असल्याचे प्रांताधिकारी निकम यांनी सांगितले. यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असून आता बार्शी वरती नवीन निर्बंध लादले आहेत. बार्शीतील सर्व व्यापार व सर्व दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत उघडी राहतील. फक्त हॉटेल व्यवसायासाठी रात्री अकराची वेळ दिले असून रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. नवीन नियमांमध्ये व्यापारी वर्गाने आता आपल्या दुकानासमोर वॉश बेसिन निर्माण करावयाचे असून त्याठिकाणी साबण, सॅनिटायझर मास्क अशी सुविधा व्यापाऱ्यांनी उपलब्ध करून द्यायचे आहे. तसेच जो नागरिक मास्क करणार नाही अशा नागरिकाला कोणताही माल द्यायचा नाही. यावेळी नव्या निर्बंधामध्ये केवळ आर्थिक दंड केला जाणार नसून एक महिना दुकान सील करण्यात येईल, असे निकम यांनी बजावले.
आता परत एकदा कंटेनमेंट झोन तयार करावयाचे असून हा कालावधी आता पंधरा दिवसाचा असणार आहे. ज्या भागांमध्ये कोरोना रुग्ण सापडला आहे. त्याठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करून पंधरा दिवस त्या ठिकाणी अतिशय कडक अशी अंमलबजावणी करण्याच्या सूचना निकम यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच रात्रीची संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना सर्व प्रशासनाला दिले आहेत
कोरोनाची दुसरी लाट थांबवण्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज असून बार्शी साठी तीन हजार बेडची क्षमता असणारी यंत्रणा निर्माण केली जात आहे. यामध्ये बार्शी शहरातील पाच दवाखाने परत एकदा डेडिकेटेड हॉस्पिटल म्हणून जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये कर्मवीर डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल , कॅन्सर हॉस्पिटल, चौधरी हॉस्पिटल, सोमानी हॉस्पिटल व अंधारे यांचे सुश्रुत हॉस्पिटल या हॉस्पिटलचा समावेश आहे तर कोरोना रुग्ण व त्यांचे संपर्कातील व्यक्तींना अलगीकरण करण्यासाठी पॉलिटेक्निकल हायस्कूल या ठिकाणी कोरोणा केअर सेंटर उभारले आहे अशी माहिती निकम यांनी दिली. तसेच मंगल कार्यालयामध्ये लग्नासाठी आता प्रशासनाची अगोदर परवानगी घ्यावी लागणार असून मंगल कार्यालयाच्या बाहेर लग्नाच्या दिवशी कोरोणा चाचणीची कॅम्प लावला जाणार आहे.
कोरोना रुग्ण वाढीचा दर पाहता निर्बंध कडक करण्याची सूचनाही निकम यांनी प्रशासनाला दिले आहेत. आता बार्शी शहरांमध्ये रोज बाराशे व्यापाऱ्यांची तपासणी केली जात आहे. बार्शी तालुक्यात कोरोनाची स्फोटक परिस्थिती असून आता कोरोना चाचणीचा वेग वाढवून प्रतिदिवशी 2000 चाचण्या केल्या जातील असेही निकम यांनी सांगितले.
बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये कोणतीही यात्रा जत्रा किंवा गर्दी होईल असे कोणत्याही कार्यक्रम करण्यास आता पूर्णपणे मज्जाव केला असून असे कार्यक्रम भरवणारा विरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.
मंदिराबाहेर कोरोना चाचणी कॅम्प
बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये मंदिरांची संख्या जास्त असून या मंदिरांमध्ये जसे की भगवंत मंदिर अशा मोठ्या मंदिराच्या दरवाजामध्ये आता कोरणा चाचणीचा कॅम्प लावला जाणार असून त्या ठिकाणी रॅपिड टेस्ट करूनच मंदिरात नागरिकांना प्रवेश दिला जाणार असे निकम यांनी या बैठकीत सांगितले.