प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरामध्ये सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून या टोळीकडून 1 लाख 40 हजार 500 रुपयांच्या तब्बल 13 सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून तिघेही विधीसंघर्ष बालक आहेत.
सातारा शहरामध्ये सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली विशेष पथकाची नेमणुक केली होती. दि. 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.00 ते 3.30 वा. दरम्यान फिर्यादी गणेश भगवान तळेकर (रा. विलासपूर गोडोली सातारा) यांनी त्यांच्या मालकीची एव्हॉन मॅक्सो कंपनीची 8 हजार रुपये किंमतीची गिअरची सायकल अज्ञात चोरटयाने चोरल्याबाबत सातारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
याच दरम्यान, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, यांना पाडळी ता. सातारा येथील एकाने त्याच्या साथीदारांसह संबंधित चोरीस गलेली सायकल व सातारा शहरातून आणखी काही सायकली चोरलेल्या असून त्या सायकल गावातील लोकांना विकल्याची बातमी मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या पथकास आरोपींना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
रमेश गर्जे, व स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने पाडळी येथे जावून एका इसमास ताब्यात घेवून तपास केला असता तो अल्पवयीन असून तो व त्याचे इतर दोन साथीदार यांनी गेल्या वर्षामध्ये सातारा शहरातील वेगवेगळया ठिकाणाहून सायकल चोरल्या असल्याचे कबुल केले. याचबरोबर त्याने 1 लाख 40 हजार 500 रुपये किंमतीच्या वेगवेगळया कंपनीच्या एकूण 13 चोरलेल्या सायकल काढून दिल्या आहेत. या सर्व सायकल गुह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित आरोपी अल्पवयीन मुलगा व त्याचा साथीदार आणखी एक विधी संघर्षग्रस्त बालक असून बाल न्याय मंडळ सातारा यांच्यासमोर हजर केले असता त्यांना जामीनावर मुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, सातारा शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते ज्यांच्या सायकल चोरीस गेल्या असतील त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथे संपर्क साधावा.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार तानाजी माने, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, प्रमोद सावंत, गणेश कापरे, अमित सपकाळ, विशाल पवार, धीरज महाडीक, विक्रम पिसाळ ,वैभव सावंत, संकेत निकम, चालक विजय सावंत यांनी केली.