बीएसएफची कारवाई
वृत्तसंस्था/ श्रीगंगानगर
राजस्थानमधील सीमेवर घुसखोरीच्या घटना सातत्याने वाढत असल्याने बीएसएफने सतर्कतेत वाढ केली आहे. श्रीगंगानगरमध्ये बीएसएफ जवानांनी मागील 15 दिवसांमध्ये 2 पाकिस्तानी घुसखोरांना भारतीय सीमेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नावेळी कंठस्नान घातले आहे. शनिवारी रात्री देखील अनपूगढच्या शेरपुरा चौकीनजीक पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा करण्यात आला आहे.
पाकिस्तानी घुसखोर झिरो लाइन ओलांडून कुंपणानजीक येत होते. बीएसएफच्या जवानांनी त्याला इशारा दिला. तरीही तो कुंपणानजीक पोहोचल्याने नाईलाजास्तव जवानांना गोळय़ा झाडाव्या लागल्या आहेत. पाकिस्तानी घुसखोराला घटनास्थळीच ठार करण्यात आले आहे. बीएसएफने घुसखोराचा मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.
मागील 15 दिवसांमध्ये बीएसएफची ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी 5 मार्च रोजी अनूपगढच्या कैलास पोस्टवर एका पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान घालण्यात आले होते. पाकिस्तानने ध्वजबैठकीदरम्यान पाक घुसखोराची ओळख पटविण्यास नकार दिला होता. पाकिस्तानची आगळीक हाणून पाडणाऱया बीएसएफने सीमेवरील सतर्कता वाढविली असून याप्रकरणाची चौकशीही करण्यात येत आहे.