नियामे / वृत्तसंस्था
आफ्रिका खंडातील नायजेर देशात बुरखाधारी बंदूकधाऱयांनी केलेल्या गोळीबारात किमान 137 लोक ठार झाले असून असंख्य जखमी झाले आहेत, अशी माहिती तेथील प्रशासनाने दिली आहे. किमान 10 मोटारसायकलस्वारांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर या देशाच्या उत्तर सीमेवरील गावांमध्ये प्रवेश केला आणि गोळय़ा चालविल्या. मृतांमध्ये अनेक महिला आणि बालकांचाही समावेश आहे.
निवडणुकीतील वादातून हे हत्याकांड घडविण्यात आले असावे असे सांगितले जाते. गेल्या आठवडय़ात येथे सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यात मोहम्मद बजूम यांना विजयी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे देशातील एक मोठा गट नाराज झाला होता. बजून यांना ज्या गावांमध्ये अधिक मतदान झाल्याचा संशय होता, अशा गावांना लक्ष्य करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. गेल्या आठवडय़ातही अशाच हल्ल्यांमध्ये 66 लोक ठार झाले होते. दोन मुस्लीम गटांमध्ये हा संघर्ष अनेक वर्षे सुरू असून गेल्या दहा वर्षांमध्ये अशी 27 हत्याकांडे झाली आहेत, अशी माहितीही ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली.