स्वतःच्या विवाहासाठी स्वप्ने अनेक मुली बघत असतात. पण विवाहाशी संबंधित सर्व स्वप्ने पूर्ण होण्याचे भाग्य निवडक मुलींच्या वाटय़ालाच येते. ऑस्ट्रेलियातील एका युवतीनेही स्वतःचा विवाह आणि यादरम्यान होणाऱया फोटोशूटशी संबंधित अनेक स्वप्ने पाहिली होती. पण ही सर्व स्वप्ने विवाहादरम्यान अतिवृष्टी झाल्याने आणि त्यानंतर पूर आल्याने अपूर्ण राहिली. येथील पूर्व किनाऱयावर सुरू असलेल्या पावसामुळे आलेल्या पुरात 18 हजार लोक अडकून पडले होते. 20 मार्च रोजी सकाळी ऑस्ट्रेलियात राहणारी कॅट फॉदरिंगमच्या घरातच पुराचे पाणी शिरत होते.
त्याचदिवशी दुपारी 3 वाजता कॅट हिने वॅने बेल याच्यासोबत विवाह केला होता. स्वतःच्या पतीसोबत वेडिंग ड्रेसमध्ये फोटोशूट करविण्याची योजना तिने आखली होती. पण पुरामुळे ते संबंधित ठिकाणापर्यंत पोहोचू शकली नाही. याचमुळे तिने पुराच्या पाण्यासमोरच फोटोशूट करविले आहे. पुलावरून पुराचे पाणी वाहत असतानाही तिने काही मित्रांसोबत फोटोशूट करविले आहे. त्यानंतर कॅटने ट्विट करत लोकांना आयोजनस्थळी पोहोचण्यासाठी मदत मागून चहुबाजूने पुरात अडकल्याचे कळविले. कॅटच्या मदतीसाठी एफिनटी हेलिकॉप्टर कंपनी सरसावली आहे. कंपनीने हेलिकॉप्टरद्वारे तिला आयोजनस्थळी पोहोचविले आहे.