बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फिके पडत असून यामागे कोरोनाचे वाढते संकट कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. तर हॉलिवूडपट गॉडझिला व्हर्सेस काँगच्या ओपनिंगने भारतीय चित्रपटसृष्टीला हैराण केले आहे. या चित्रपटाने अलिकडेच प्रदर्शित हिंदी चित्रपट रूही आणि मुंबई सागापेक्षाही अधिक चांगली कामगिरी केली आहे.
ऍडम विनगार्ड दिग्दर्शित ‘गॉडझिला व्हर्सेस काँग’ चित्रपट 24 मार्च रोजी भारतीय बॉक्स ऑफिसवर झळकला आहे. देशात इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये 6 कोटी रुपयांपेक्षा अधिक ओपनिंग मिळविल्याचे समजते.
चित्रपटाच्या कलेक्शनचा मोठा हिस्सा दक्षिण भारतातून आला आहे. चित्रपटाने तामिळनाडूत उत्तम ओपनिंग मिळविली आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित रुही चित्रपटाने सुमारे 3 कोटी रुपयांचे ओपनिंग प्राप्त केले होते. तर 19 मार्च रोजी झळकलेल्या मुंबई सागाने पहिल्या दिवशी 2.82 कोटी रुपये जमविले होते.