बचाव पक्षाकडून आरोप : ज्योती मांढरेने आरोप नाकारले : पुढील सुनावणी 8 एप्रिल रोजी
प्रतिनिधी / सातारा
वाईतील व्यापारी ओसवाल यांच्यासह त्यांच्या मारेकऱ्यांचा खूनही ज्योती मांढरे, तिचा भाऊ, बहीण व बहिणीच्या दीराने केला असल्याचा आरोप न्यायालयात बचाव पक्षाने गुरुवारी केला. तर डॉ. घोटवडेकरांशी तडजोड करुन पोलिसांना त्यांना यातून बाहेर काढले असल्याचा आरोप सुनावणीत बचाव पक्षाने केला असून करोडो रुपयांचा व्यवहार झाला असल्याचेही म्हटले आहे. मात्र, सुनावणीत बचाव पक्षाच्या प्रश्नांना उत्तरे देताना ज्योती मांढरे हिने तिच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान, आता या खटल्याची पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी होणार आहे.
सातारा जिल्हा न्यायालयात वाईतील सहाजणांच्या हत्याकांडाची सुनावणी सुरू आहे. हे हत्याकांड वाईतील कथित डॉक्टर संतोष पोळ याने केले होते. बचाव पक्षाकडून माफीचे साक्षीदार ज्योती मांढरे हिचा उलट तपास घेताना सलग दुसऱया दिवशीही बचाव पक्षाने तिच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. पोलिसांशी हातमिळवणी करून ज्योती मांढरे ही ब्लॅकमेल करून पैसे उकळायची. वाईतील व्यापारी ओसवाल यांचा खूनही ज्योती व तिची बहीण भावजी यांनी मारेकऱयांना सांगून त्यांचा खून केला. मारेकरी आपले नाव घेतील म्हणून संबंधित मारेकऱ्यांचाही खून ज्योतीने केला. असे एकूण चार खून ज्योतीने केल्याचा आरोप बचाव पक्षाने केला आहे. ओसवाल यांचा खून करणारे ज्योतीच्या घराशेजारी राहत होते व ते ज्योतीच्या परिचयाचे होते असा आरोपही बचाव पक्षाने केला. यावेळी ज्योतीने हे सर्व आरोप खोटे असल्याचे न्यायालयात सांगितले.
बचाव पक्षातर्फे ऍड. श्रीकांत हुटगीकर यांनी ज्योतीवर प्रश्नांची सरबत्ती करताना खळबळजनक आरोप केले. ज्योती ज्या टोल क्रमांकावरुन केनिया, नायझेरियात फोन करत होती. तिकडे तू कोणाशी बोलत होतीस असा प्रश्न केला. त्यावर ज्योतीने माझ्या मामाची व मावशीची मुलगी तिकडे असल्याचे सांगितले. त्यांनी कोणत्या महापुरुषांशी लग्ने केली आहेत व त्यांचा व्यवसाय काय आहे ? यावर त्या दोघांची पती कुक असल्याचे उत्तर ज्योतीने दिले. ज्या एका मोबाईल क्रमांकावरुन संतोष पोळ याला कॉल केले जाते होते तो मोबाईल ज्योतीचा भाऊ विकास मांढरेकडे असल्याचे बचाव पक्षाने सुनावणी दरम्यान निदर्शनास आणून दिले. मंगल जेधे व नथमलचे मृतदेह काढताना त्यांच्यासोबत दोन मृतदेह काढण्यात आले त्यांच्या ते गायब करण्यात असून व्यापारी ओसवालांसह आणखी चार खून झाले असून ते पोलीस रजिस्टरी मिसिंग असल्याचे ऍड. हुटगीकर यांनी सांगत ज्योतीवर गंभीर आरोप केले. मात्र, तिने ते नाकारले आहेत.
माफीच्या साक्षीदारावरच झाले आरोप बचाव पक्षातर्फे उलटतपासणीत ऍड. हुटगीकर यांनी खळबळजनक आरोप केले. माफीची साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरे, तिचा भाऊ, बहिण, बहिणीचा दीर यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला. माफीची साक्षीदार याची समाधानकारक उत्तरे देवू शकत नसेल ती माफीची साक्षीदार असण्याला काहीच अर्थ नसल्याचे ऍड. हुटगीकर यांनी म्हणणे मांडलेय. पुढील सुनावणीत ते पुरावे दाखल करणार आहेत. मात्र, ज्योती मांढरेवर केलेल्या आरोपाचे पुरावे अद्याप न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याचे सरकार पक्षातर्फे सांगण्यात आले. या सुनावणीवेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे स्वतः हजर होते. या खटल्याची पुढील सुनावणी 8 एप्रिल रोजी होणार आहे. |