बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना व धारवाड विभागिय क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने केएससीए धारवाड झोन फर्स्ट डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने आनंद क्रिकेट अकादमी संघाचा 6 गडय़ानी पराभव करून 4 गुण मिळविले. नितीन एस. व चिराग नायक यांची शतके लक्षवेधी ठरली.
ऑटोनगर येथील केएससीए स्टेडियमवर आनंद क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 207 धावा जमविल्या. त्यात नितीन एस.ने 3 षटकार, 13 चौकारासह 123 धावा करून स्पर्धेतील पहिले शतक झळकविले. त्याला प्रणय गोखलेने 1 षटकार, 3 चौकारासह 30, आर्यन उपाध्येने 12, अक्षय पाटीलने 11 धावा करून साथ दिली. हुबळी स्पोर्ट्सतर्फे सुनीलकुमारने 37 धावात 3, गंगाराम पवारने 35 धावात 2, अक्षय पत्तारने 43 धावात 2, तर रोहितकुमार एसी, रोहन यारिसिम्मी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने 46.5 षटकात 4 बाद 213 धावा करून सामना 6 गडय़ानी जिंकला. त्यात सलामीच्या चिराग नायकने 1 षटकार, 5 चौकारासह 101 धाव करून शतक झळकविले. रोहन यारिसिम्मीने 5 चौकारासह 48, विठ्ठल हबीबने 2 षटकारासह 16, सुधन्वा कुलकर्णीने 3 चौकारासह 15, नवीन संकल्पने 11 धावा केल्या. आनंदतर्फे प्रणय गोखले, आर्यन उपाध्ये, नितीन एस., वाहिद हंचिनमनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.