पीडितेच्या वैद्यकीय तपासणीला विलंब झाल्याने महिला संघटनांचा आक्रोश
प्रतिनिधी / बेळगाव
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून शुक्रवारी टिळकवाडी पोलिसांनी गवंडी कामगाराला अटक केली आहे. दरम्यान पीडितेच्या वैद्यकीय तपासणीला सिव्हिलमध्ये विलंब झाला आहे. बिम्स् प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे उघडकीस आल्याने महिला संघटनांनी आक्रोश व्यक्त केला आहे.
आनंद मासण्णावर (वय 21, रा. भांवीहाळ, ता. बैलहोंगल) असे पोलिसांनी अटक केलेल्या गवंडी कामगाराचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले. त्यावेळी पीडित मुलीचे कुटुंबीय व महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करीत संताप व्यक्त केला.
महिला संघटनेच्या अक्काताई सुतार, मिलन पवार आदींनी पोलीस अधिकाऱयांना जाब विचारला. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी शुक्रवारी सकाळी 8 वा. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रात्री 8 पर्यंत प्रसूती विभागाच्या तज्ञांकडून तिची तपासणी झाली नाही. महिला संघटनांनी जाब विचारताच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी धावपळ सुरू झाली.
निर्भया घटनेनंतर पीडितेची एकाच छताखाली वैद्यकीय तपासणी केली पाहिजे, असा नियम आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे आधीच त्रासलेल्या पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली त्रास होवू नये, असा या मागचा हेतू आहे. मात्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या सर्व नियमांना हारताळ फासून पीडितेची व कुटुंबीयांचे हाल होईल याची व्यवस्था केली जाते.
बिम्स् प्रशासनाच्या कारभाराला आक्षेप शुक्रवारी महिला संघटनांनी बिम्स् प्रशासनाच्या कारभाराला आक्षेप घेताच वैद्यकीय तपासणीसाठी धावपळ सुरू झाली. अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. लवकरात लवकर एका छताखाली तिची वैद्यकीय तपासणी करण्याची गरज आहे. मात्र सिव्हिलमध्ये तसे होताना दिसत नाही. परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर महिला संघटनांना एकत्रीत करुन बिम्स् प्रशासनाविरुध्द मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा अक्काताई सुतार यांनी दिला आहे. या संबंधी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्याशीही आपण चर्चा केली असून सिव्हिलमधील व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.