तुरुंग अधिकाऱ्याला अर्वाच्य शिवीगाळ
प्रतिनिधी / कोल्हापूर
तुरुंग अधिकाऱ्याकडून सकाळी साडेनऊ वाजता कारागृहातील बंदीजणांची तपासणी व पाहणी सुरु असताना एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने थेट तुरुंगाधिकाऱ्याच्या अंगावर धाऊन जात हल्ल्याचा प्रयत्न केला. तसेच अर्वाच्य शिवीगाळही केली. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कैद्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
जुना राजवाडा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, प्रविण यशवंतराव औंढेकर हे कळंबा कारागृहात श्रेणी 2 मधील तुरुंग अधिकारी आहेत. तर किरण उर्फ करन प्रकाश सुर्यवंशी (वय 36, रा. गार्डी, ता. खानापूर, जि. सांगली) हा एका गुन्ह्यात कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. 30 मार्च रोजी तुरुंग अधिकारी औंढेकर हे सकाळी साडेनऊ वाजता कैद्याची पाहणी करत होते. त्यावेळी अन्य कैद्यांच्या पायामध्ये चप्पल नव्हती.
मात्र सुर्यवंशी याच्या पायामध्ये चप्पल आढळल्यामुळे औंढेकर यांनी त्याला जाब विचारला, याचा राग येऊन सूर्यवंशी हा औंढेकर यांच्या अंगावर धाऊन गेला. तसेच मोठमोठÎाने आरडाओरडा करुन शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न केला. यामुळे औंढेकर यांनी त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद दिली आहे. जुना राजवाडा पोलीस तपास करीत आहे.