ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाने बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला आहे. बॉलिवूडचे कलाकार एकामागून एक कोरोनाच्या विळख्यात अडकत आहे. आता जेष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहरी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
बप्पी लहरी यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘शक्य ती सगळी खबरदारी घेतल्यानंतरही बप्पी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
बप्पी लहरी यांची मुलगी रेमा लहरी बंसल हिने सांगितले की बप्पी दा यांनी सतत कोरोना नियमांचे पालन केले आणि तेवढीच काळजीही घेतली मात्र तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच लवकरच ते घरी पुन्हा येतील. यासोबतच बप्पी यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्याचे रेमाने यावेळी आभारही मानले आहेत.
दरम्यान, मागील महिन्याभरात बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांना कोरोनाची लागण झाली. यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, रणबीर कपूर, मनोज वाजपेयी, आमिर खान, आर माधवन, मिलिंद सोमण, फातिमा सना शेख, कार्तिक आर्यन यांचा समावेश आहे. त्यांच्यामध्ये आता बप्पीदांचे नाव देखील जोडले गेले आहे.