ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. एक एप्रिल पासून 45 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस टोचून घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
त्यातच गुरुवारी आतापर्यंतची सर्वाधिक लसीकरणाची संख्या समोर आली आहे. 1 एप्रिल रोजी 36 लाख पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, एक एप्रिल रोजी 36 लाख 71 हजार 242 लोकांना कोरोनाचा डोस देण्यात आला. तर आतापर्यंत 6 कोटी 87 लाख 89 हजार 138 लोकांना लस देण्यात आली आहे.
- महाराष्ट्रात 3 लाख पेक्षा अधिक लोकांना लस
महाराष्ट्रात काल (1 एप्रिल) एका दिवसात तब्बल तीन लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट दिली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, राज्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून काल एकाच दिवशी 3 लाख नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने उच्चांक गाठला. लसीकरणाला वेग देऊन यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात काल रेकॉर्ड ब्रेक लसीकरणाची नोंद झाली. विशेष म्हणजे या लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. पुणे जिल्ह्यात काल एकाच दिवशी तब्बल 57 हजार जणांना कोरोना लस देण्यात आली.
- बिग बींनी घेतली कोरोनाची पहिली लस
अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी रात्री ट्विट करत सांगितले की, मी देखील कोरोनाचा पाहिला डोस आज घेतला आहे. पुढे ते म्हणाले, अभिषेक बच्चन व्यतिरिक्त कुटुंबातील सर्वांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती.