12 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान
प्रतिनिधी/ मेढा
बुधवारी पहाटेच्या सुमारास मेढा एसटी डेपो जवळ असणाऱया किराणा मालाच्या दुकानात आग लागून लाखो रूपयांची हानी झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. दरम्यान, आग कशामुळे लागली यांचे कारण अद्याप समजू शकले नाही.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सातारा- महाबळेश्वर रोडवर मेढा एसटी डेपोजवळ चंद्रकांत चिंचकर यांच्या मालकीचे किराणा मालाचे दुकान गेल्या 25 वर्षापासुन आहे. पहाटेच्या सुमारास या दुकानाला अचानक आग लागली. परिसरातून मोठे धुराचे लोट दिसू लागल्याने एकच खळबळ उडाली. ही बाब लक्षात येताच स्थानिक युवक, नागरिकांनी तब्बल चार तास आग विझवण्याचा प्रयत्न केला. विलास पवार, सुनिल जवळ, अंकुश कदम यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपले पाण्याचे टॅंकर आणून आग विझविण्यासाठी विशेष सहकार्य केले. तर सातारा नगरपरिषदेचा अग्नग्निशामक दलाचे वाहनही घटनास्थळी दाखल होवून आग विझविण्यास सहकार्य केले. आग एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर फैलावली होती की दुकानातील साहित्य अक्षरक्षः जळून खाक झाले.
दरम्यान, या दुकानाचे बांधकाम आरसीसी असल्याने आग आजूबाजूच्या परिसरात पसरली नाही. तसेच शेजारील दुकानाचे या आगीमुळे नुकसान झाले नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, एवढी मोठी घटना घडूनही नगरपंचायतीची यंत्रणा मात्र मदतीला पोहचू शकली नाही. त्यामुळे नागरिकांच्यामधून नाराजीचा सूर आहे. या घटनेनंतर मेढा नगरपंचायतीने परिसरातील दुकानाचे ऑडिट करून दुकानदारांना फायर सिस्टिम बसविण्याची सक्ती करावी, याचबरोबर फायर इन्शुरन्स पॉलिसी असल्यास संबंधित दुकानदारांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी मदत होईल, त्यामुळे भविष्यातील अशा दुर्घटना तसेच या दुर्घटनेतून होणारे नुकसान टाळण्यासाठी मेढा नगरपंचायतीने योग्य ती भूमिका घ्यावी, अशीही मागणी परिसरातील नागरिकांमधून होवू लागली आहे.
घटनास्थळांचा पंचनामा मेढय़ाचे तलाठी सावंत यांनी केला असून सुमारे 12 लाखाचे आर्थिक नुकसान झाले असल्याचा त्यांनी अहवाल तयार केला आहे.