सांस्कृतिक प्रतिनिधी / फोंडा
कला रंग प्रतिष्ठान गोवा या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त शनिवार 10 एप्रिल रोजी पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात गुणीरंग संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दिवसभराच्या या संगीत महोत्सवात गोव्यातील नामवंत कलाकारांच्या गायन वादनाच्या मैफली होणार आहेत.
संगीत महोत्सव गोव्यातील बुजुर्ग संगीत कलाकार पं. रत्नकांत रामनाथकर, पं. वि. रा. आठवले, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. बबनराव हळदणकर व उस्ताद अस्लम खान यांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आलेला आहे. संगीत महोत्सवाचे उद्घाटन सकाळी 10 वा. पद्मश्री पं प्रसाद सावकार यांच्याहस्ते होणार असून यावेळी मिनेझिस ब्रागांझा इन्स्टीटय़ुटचे अध्यक्ष दशरथ परब व अन्य मान्यवर उपस्थित असतील. पहिल्या सत्रात किरण रायकर, अमेय वाडेकर, अमला कारापूरकर, पंकज नाईक व डॉ. प्रवीण गांवकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. दुसऱया सत्रात सायं. 6.15 वा. सम्राज्ञी शेलार, शांताराम गोवेकर व पं. कमलाकर नाईक यांचे शास्त्रीय गायन होईल. तत्पूर्वी संस्थेचे आश्रयदाते व हितचिंतक कै. पुंडलीक उर्फ भाई केणी, डॉ. रमेश धुमे, गजानन गोलतकर, अनिता गदगकर व शरयू नाईक यांचा सत्कार होणार आहे. या संगीत महोत्सवात सहभागी होणाऱया कलाकारांचा संक्षिप्त परिचय पुढील प्रमाणे आहे.
पं. कमलाकर नाईक – पं. कमलाकार नाईक हे गोव्यातील एक ज्येष्ठ शास्त्रीय गायक आहे. ते पं. रत्नकांत रामनाथकर यांचे शिष्य असून पं. वि. रा. आठवले, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. बबनराव हळदणकर, व उस्ताद अस्लम खान यांच्याकडूनही तालीम लाभली. कला अकादमीच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विभागात गुरु म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक शिष्य घडविले. गोवा संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पुणे येथील अत्यंत प्रतिष्ठेच्या सवाई गंधर्व संगीत संमेलनाबरोबरच त्यांनी गोव्यातील सर्व संगीत संमेलनातून व गोव्याबाहेर अनेक संगीत महोत्सवातून गायन केले आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराबरोबरच अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना लाभले आहेत. आकाशवाणीच्या राष्ट्रीय प्रसारणातून त्यांचे गायन प्रसारित झाले आहे.
डॉ. प्रवीण गांवकर – हे पं. कमलाकर नाईक यांचे शिष्य असून त्यांना पं. अजय चक्रवर्ती व पं. सत्यशिल देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभत आहेत. सुगम संगीताचे मार्गदर्शन त्यांनी पं. सुरेश वाडकर यांच्याकडून घेतले आहे. ‘इटस माफ लाईफ’ या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिले असून भक्तीगीतांचे अभंगही प्रसिद्ध झाले आहेत. दिल्ली दूरदर्शनचा त्यांना पुरस्कार लाभला आहे.
अमला कारापूरकर – अमला यांचे शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण रंजन कश्यप यांच्याकडे व त्यानंतर प्रगत शिक्षण पं. कमलाकर नाईक यांच्याकडे झाले आहे. गोव्यातील अनेक संगीत संमेलनामध्ये त्यांनी आपली कला सादर केली आहे.
किरण रायकर – किरण रायकर हे संगणक विज्ञान शाखेचे उच्च पदवीधर असून पं. कमलाकार नाईक यांच्याकडे गेली 9 वर्षे शास्त्रीय गायन शिकत आहेत. पं. रत्नकांत रामनाथकर संमेलन, जगन्नाथ पेठकर गुरुजी संमेलन अशा विविध संमेलनामध्ये ते गायिले आहेत.
अमेय वाडीकर – अमेय हे गेली सुमारे बारा वर्षे पं. कमलाकर नाईक यांच्याकडे शास्त्रीय गायन शिकत आहेत. उपशास्त्रीय संगीतात भजन या प्रकारात त्यांना विशेष रुची आहेत. विविध संगीत संमेलनातून त्यांनी आपली कला पेश केली आहे.
पंकज नाईक – पंकज यांनी आपले वडील पं. कमलाकर नाईक यांच्याकडून बालपणापासूनच शास्त्रीय गायनाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. गोवा संगीत महाविद्यालयाची पदवी व पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. गोव्यातील अनेक नामांकित संगीत महोत्सवात ते गायिले आहेत. स्वरमिश्र व इंडोजॅझ या कार्यक्रमाचीही त्यांनी निर्मिती केली आहे.
शांताराम गोवेकर – गोवेकर यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण पं. जयवंत मांद्रेकर यांच्याकडून घेतले. गेली अनेक वर्षे ते पं. कमलाकर नाईक यांच्याकडे पुढील शिक्षण घेत आहेत. भजन, नाटय़गीते ते उत्कृष्टरित्या गातात. गोव्यातील अनेक संगीत संमेलनामध्ये त्यांनी आपली कला पेश केली आहे.
कलाकारांना संवादिनीवर विठ्ठल खांडोळकर, प्रसाद गांवस, सुभाष फातर्पेकर व दत्तराज म्हाळशी, तबल्यावर दयानंद कांदोळकर, नितीन कोरगांवकर, दामोदर हेदे व अमर मोपकर तर सारंगीवर वसीम खान हे साथसंगत करणार आहेत. दुर्गाकुमार नावती हे या कार्यक्रमाचे निवेदन करतील.