प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात कोरोनाचे नियम मोडणाऱयांवर कारवाई करुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिकेची पथके पायाला भिंगरी लावून काम करत आहेत. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिलेल्या सुचनेनुसार कोरोना कक्षाचे प्रमुख प्रणव पवार, अतिक्रमण हटावचे प्रमुख प्रशांत निकम आणि स्थावर जिंदगीच्या प्रमुख प्रणिता शेंडगे यांनी जोरदारपणे कारवाई करत आहेत. त्यांनी गेल्या वर्षभरात सातारा शहरात नियम मोडणाऱयांवर कारवाई करुन तब्बल 10 लाख 93 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर विना मास्कचा 8 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एका महिन्यात 1 लाख 16 हजार रुपयांचा दंड नियम न पाळणाऱयांकडून वसूल केला आहे.
सातारा शहरात कोरोनाचा फैलाव वाढू नये याकरीता मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी नियोजनबद्द आराखडा केला आहे. पथके नेमलेली आहेत. पथकांकडून कारवाईला गेल्या एक वर्षापासूनच सुरवात आहे. सातारा शहरात जे जे नागरिक नियम मोडतात त्यांच्यावर दंडाची कारवाई सुरु आहे. मास्क नसणे, सोशल डिस्टन्स न पाळणे यावर नियमानुसार व ठरवून दिलेला दंड करत आहेत. त्यामुळे पालिकेचे कोरोना कक्ष प्रमुख प्रणव पवार, अतिक्रमण हटाव विभागाचे पथक प्रमुख प्रशांत निकम, स्थावरच्या प्रमुख प्रणिता शेंडगे यांनी सातारा पोलिसांच्या सहकार्याने कारवाया केल्या आहेत. शहरातील गर्दीच्या ठिकाणी त्यांनी या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वर्षभरात 10 लाख 93 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून मास्कची कारवाई 8 लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे. तसेच एका महिन्यात 1 लाख 16 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.