क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील लढतीत वास्को स्पोर्ट्स क्लबने पिछाडीवरून एफसी गोवा डेवलपमेंटल संघाला 2-1 गोलानी पराभूत केले. वास्को स्पोर्ट्स क्लबसाठी मॅथ्यू कुलासो व डॅनील रिबेलोने तर एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघाचा एकमेव गोल डॅल्टन कुलासोने नोंदविला.
जीएफएच्या धुळेर मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यातील विजयाने वास्को स्पोर्ट्स क्लबला 3 गुण प्राप्त झाले. वास्को क्लबने इंज्युरी वेळेत केलेला गोल संघाला तीन गुण मिळवून देणारा ठरला. एफसी गोवाने आरंभालाच धोकादायक चाली रचल्या. वॅल्रॉय फर्नांडिस व डॅल्टन कुलासोने वास्कोच्या बचावफळीत वारंवार आक्रमणे रचली.
वास्कोचा गोलरक्षक संजू थापाने सामन्याच्या दहाव्या मिनिटाला वॅल्रॉय फर्नांडिसचा गोल करण्याचा यत्न थोपविला. त्यानंतर लगेच 38व्या मिनिटाला एफसी गोवाच्या सॅरिनियो फर्नांडिसचा गोल करण्याचा यत्न वास्कोचा गोलरक्षक थापाने उत्कृष्टपणे अडविला. या स्पर्धेत एफसी गोवासाठी आपला पहिलाच सामना खेळणाऱया ऋतिक तिवारीने वास्कोच्या मॅथ्यू कुलासोचा काऊंटरऍटेकवर गोल करण्याचा यत्न हाणून पाडला.
दुसऱया सत्रात दोन्ही संघानी आक्रमक खेळ करून गोल करण्याचे यत्न केले. दुसऱया सत्रात 60व्या मिनिटाला वास्को स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक मिकी फर्नांडिसला रेफ्रीने रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर घालविले. त्यानंतर लगेच एफसी गोवाने गोल करून आघाडी घेतली. यावेळी कपिल होबळेच्या पासवर कुलासोने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला भेदत गोल नोंदविला.
मात्र, एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघाची ही आघाडी केवळ एक मिनिट टिकली. वास्को स्पोर्ट्स क्लबच्या मॅथ्यू कुलासोने गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला. सामना बरोबरीत राहणार असे वाटत असतानाच डॅनी रिबेलोने इंज्युरी वेळेतील पहिल्या मिनिटाला वास्को स्पोर्ट्स क्लबचा विजयी गोल केला. या गोलानंतर वास्को क्लबच्या सॅन्वील डिकॉस्ताला सामन्यात दोन यलो कार्डे पडल्याने मैदानाबाहेर जावे लागले. एफसी गोवाचा पुढील सामना 18 एप्रिल रोजी सेसा फुटबॉल अकादमीविरुद्ध खेळेल.