आयपीएल साखळी सामना : सातत्य राखण्यासाठी मुंबई प्रयत्नशील, पंजाब किंग्ससमोर विजयपथावर परतण्याचे लक्ष्य
वृत्तसंस्था / चेन्नई
विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स व पंजाब किंग्स आज (दि. 23) आयपीएल साखळी फेरीत आमनेसामने भिडणार असून एकीकडे, मुंबई आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील असेल तर दुसरीकडे, पंजाब किंग्स संघासमोर विजयरथावर परतण्याचे आव्हान असणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता या लढतीला सुरुवात होईल.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फलंदाजीतील हाराकिरीमुळे अपयशाला सामोरे जावे लागले होते. त्याची येथे भरपाई करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. रोहित शर्मा फलंदाजीत चमकला. पण, त्याचे अन्य सहकारी अपेक्षा पूर्ण करु शकले नव्हते. मध्यफळीतील फलंदाजांचे अपयश ही मुंबईची मुख्य चिंता आहे.
मुंबईची गोलंदाजी बरीच भक्कम आहे. पण, दिल्लीविरुद्ध ते क्लिक होऊ शकले नाहीत आणि मुंबईला पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. दिल्लीविरुद्ध रोहित उत्तम खेळला असला तरी सुर्यकुमार यादव व इशान किशन मॅचविनिंग योगदान देऊ शकलेले नाहीत. त्यातच केरॉन पोलार्ड व पंडय़ा बंधूंचा (हार्दिक व कृणाल) खराब फॉर्म चिंतेत भर घालणारा ठरत आला आहे. अद्याप हा आयपीएल स्पर्धेचा पहिला टप्पा आहे. त्यामुळे, मुंबईसह अन्य संघांना अशा त्रुटी दूर करण्याची संधी असणार आहे.
पंजाबसमोर अनेक आव्हाने
पंजाब किंग्स संघाने या मोसमात विजयी सुरुवात केली. मात्र, त्यानंतर सलग 3 पराभवामुळे या संघाला चांगलाच झटका बसला आहे. सनरायजर्स हैदराबादने या संघाला अवघ्या 120 धावांमध्येच गारद करत त्यांच्या फलंदाजीतील मर्यादा आणखी चव्हाटय़ावर आणल्या. काही प्रमाणात केएल राहुल व मयांक वगळता त्यांचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत आणि गोलंदाजी तर अगदीच सर्वसाधारण स्वरुपाची राहिली आहे.
युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल अद्याप आपण बॉस असल्याचे दाखवून देऊ शकलेला नाही. याशिवाय, मध्यफळीतील त्याचा राष्ट्रीय सहकारी निकोलस पूरन देखील आपला लौकिक सिद्ध करु शकलेला नाही. सलग 3 पराभवाची नामुष्की मागे टाकत पंजाबला वेळीच विजयाच्या ट्रकवर यावे लागेल. असे झाले नाही तर मात्र त्यांच्यासमोर प्ले-ऑफपूर्वीच स्पर्धेतून गारद होण्याचा धोका असणार आहे.
केएल राहुलने 4 सामन्यात 2 अर्धशतके झळकावली असली तरी त्याला अन्य फलंदाजांकडून समयोचित साथ मिळालेली नाही. अगदी त्याचे नेतृत्वही संघसहकाऱयांकडून अपेक्षित कामगिरी करवून घेण्यात यशस्वी ठरलेले नाही, असे आतापर्यंतच्या वाटचालीवरुन दिसून येत आहे. दीपक हुडाने आपली उपयुक्तता दाखवून दिली. पण, संघाची गरज पाहता त्याला आपला खेळ आणखी उंचवावा लागेल, हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
झाय रिचर्डसन व रिले मेरेडिथ हे ऑस्ट्रेलियन खेळाडू अधिक महागडे ठरले आहेत आणि यामुळे संघाबाहेर देखील फेकले गेले आहेत. पंजाबचा संघ मुरुगन अश्विनऐवजी रवी बिश्नोईचा विचार करु शकेल. तसेच, तंदुरुस्त ख्रिस जॉर्डन संघात परतू शकतो.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), ऍडम मिल्ने, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दिक पंडय़ा, इशान किशन, जेम्स नीशम, जसप्रित बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पंडय़ा, मार्को जान्सन, मोहसिन खान, नॅथन काऊल्टर-नाईल, पियुष चावला, क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), राहुल चहर, सौरभ तिवारी, सुर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, युद्धवीर सिंग.
पंजाब किंग्स : केएल राहुल (कर्णधार, यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंग, प्रबसिमरन सिंग, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सर्फराज खान, दीपक हुडा, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, दर्शन नळकांडे, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरेडिथ, मोईसेस हेन्रिक्यूज, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंग, फॅबियन ऍलन, सौरभ कुमार.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.