बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाने एक भयानक रूप धारण केले आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख उंचावतच चालला आहे. शुक्रवारी राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली. २४ तासात राज्यात २६ हजाराहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान शुक्रवारी २६,९६२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर त्याच वेळी, कोरोना संसर्गामुळे १९० बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी राज्यातील ८,६९७ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. यासह, राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या २,१४,३११,पर्यंत पोहोचली आहे. राज्यात शुक्रवारपर्यंत कोरोनामुळे एकूण १४,०७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिह्यात कोरोनाने उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यात दररोज कोरोनाच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १६,६६२ नवीन रुग्णांची भर पडली. तर ४,७२७ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत.