फलक-झुडपाच्या आड असल्याने मजकूर दिसणे मुश्कील : हद्दीची ओळख ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवा
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या हद्दीबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांसह मनपा अधिकाऱयांना होण्याच्यादृष्टीने हद्दीवर फलक लावण्यात येत आहेत. राजेंद्र प्रसाद चौकापासून कॅन्टोन्मेंट बोर्डची हद्द सुरू होत असल्याने या ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणी यापूर्वी असलेल्या फलक आणि झाडाझुडपांमुळे हद्दीचे फलक झाकोळले आहेत. त्यामुळे फलक लावण्याचा उद्देश काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहराच्या सभोवती कॅन्टोन्मेंट आणि ग्राम पंचायतींची हद्द सुरू होते. मात्र, महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नसल्याने समस्यांबाबत महापालिकेकडे तक्रारी करण्यात येतात. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीवर फलक लावण्याचा महापालिकेचा प्रस्ताव होता. यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीवर फलक लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेने अलीकडेच जीपीएस नकाशाकरिता प्रस्ताव तयार केला आहे. पण नकाशा तयार करताना महापालिकेच्या हद्दीबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्या. ग्राम पंचायत हद्द आणि महापालिकेच्या हद्दीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीची ओळख ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या सभोवती कॅन्टोन्मेंट बोर्ड, लष्करी, वनखाते आणि ग्राम पंचायतींची हद्द येते. शहराच्या मध्यवर्ती भागातही कॅन्टोन्मेंट बोर्डची हद्द असून महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे शहरात निर्माण होणाऱया समस्यांबाबत महापालिकेकडे तक्रारी करतात. ग्राम पंचायत हद्दीत येणाऱया परिसरातील तक्रारीही महापालिकेकडे करण्यात येतात. त्यामुळे समस्यांचे निवारण करताना महापालिकेला अडचणी निर्माण होतात. महापालिका हद्द निश्चित करून त्या ठिकाणी फलक लावणे आवश्यक आहे. पण हद्द कुठे आहे याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱयांनाच माहीत नसते, त्यामुळे हद्दीवर फलक लावण्याचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे.
राजेंद्र प्रसाद चौकापासून कॅन्टोन्मेंट बोर्डची हद्द सुरू होते. या ठिकाणी नागरिक कचरा टाकत असतात. याबाबत महापालिकेकडे तक्रारी करण्यात येतात. त्यामुळे एका बाजूला कॅन्टोन्मेंट हद्द सुरू होत असल्याचा फलक महापालिकेच्यावतीने लावला
आहे. मात्र, यापूर्वी कॅन्टोन्मेंटने बोर्ड लावला आहे, तसेच कचरा टाकू नये असा फलक आहे.
त्याशेजारी शाळा असल्याच्या माहितीचा फलक रहदारी खात्याने लावला आहे. या ठिकाणी असलेल्या तीन फलकांमध्ये महापालिकेने हद्दीचा फलक लावला आहे. त्यामुळे महापालिकेने उभारलेला फलक पूर्णपणे झाकोळला आहे.
फलक लावण्याचा उद्देश निष्फळ
दुसऱया बाजूला महापालिकेची हद्द सुरू होत असल्याचा फलक लावण्यात आला आहे. सदर फलकासमोर झाडेझुडपे असल्याने हा फलक दिसत नाही. झुडुपाच्या मागे हा फलक उभारण्यात आल्याने फलकावरील मजकूर दिसत नाही.
त्यामुळे या ठिकाणी फलक लावण्याचा उद्देश काय? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. येथील अडथळय़ात फलक उभारण्यात आले असल्याने फलक लावण्याचा उद्देश निष्फळ ठरला आहे.