मुंबई
ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनी हय़ुंडाई इंडियाने वर्ष 2021 मध्ये कार विक्रीच्या विकासात दोन अंकी वाढीची अपेक्षा व्यक्त केली आहे. कोरोना महामारीचा व्यवसायाला फटका बसत असला तरी लोकांची गाडी घेण्याबाबतची इच्छा काही कमी झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात कंपनीच्या कार्सना ग्राहकांची पसंती नक्कीच दिसेल, असे कंपनीने म्हटले आहे.
बाजारात अनेक आव्हाने असली तरी कंपनीला यावर्षी कार विक्रीत दोन अंकी वाढ साध्य करता येणार आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत आम्ही अधिक सजग झालो आहोत आणि विक्री वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न यावर्षी केले जातील. वर्षाच्या शेवटी वाहन विक्रीत 20 टक्के विकास साधू शकू असा विश्वास हय़ुंडाई मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एस. एस. कीम यांनी व्यक्त केला आहे. वाहन विक्री कोरोनापूर्व परिस्थितीत पोहचण्याच्या जवळ आम्ही आहोत. कामगिरीत सातत्य असून मागणीतही सातत्य राहील्यास दोन अंकी विकास यंदा नक्कीच गाठला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान हय़ुंडाई इंडियाने 2018 मध्ये 5 लाख 50 हजार 2, वर्ष 2019 मध्ये 5 लाख 10 हजार 260 आणि 2020 मध्ये 4 लाख 23 हजार 642 कार्सची विक्री केली होती. तेव्हा मागच्या वर्षाची विक्रीसंख्या गाठण्याचे आमचे लक्ष असणार असून येणाऱया काळातील परिस्थिती व ग्राहकांचा प्रतिसाद यावर सर्व काही अवलंबून असणार असल्याचे कीम यांनी म्हटले आहे.