सीटूची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारचा निषेध
प्रतिनिधी / बेळगाव
आरोग्य सेवा असू दे किंवा सरकारच्या इतर योजना असू देत सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे काम अंगणवाडी कर्मचारी करत आहेत. शिक्षणाबरोबरच त्यांचे हे काम सुरू आहे. असे असताना कोरोना झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱयांची साधी विचारपूसही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत नाही. हे खरोखरच दुर्दैव असून आम्हाला उपचारासाठी कोणतीच मदत केली नाही. कोरोना झाल्याचे प्रमाणपत्र तरी द्यावे, अशी मागणी सीटूच्यावतीने करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून सरकारचा व जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यात आला. एकूण चार अंगणवाडी कर्मचाऱयांना कोरोना झाला होता. त्यामधील दोन अंगणवाडी कर्मचारी उपचार घेवून घरी परतले आहेत तर दोन कर्मचारी क्वारंटाईनमध्ये आहेत. उपचार घेतलेल्या अंगणवाडी कर्मचाऱयांना तीन लाख रुपये खर्च आला आहे. याबाबत सर्व बिले देण्यात आली आहेत. मात्र ही रक्कम अद्याप देण्यात आली नाही. तसेच देणार असे आश्वासनही दिले नाही.
कोरोना काळात सर्व कामे अंगणवाडी कर्मचारी करत आहेत. मात्र कोणत्याच प्रकारे भत्ता किंवा इतर सुविधा देण्यात येत नाहीत, असा आरोप देखील यावेळी करण्यात आला. सरकारच्या या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी क्यक्त करून निषेध नोंदविण्यात आला आहे. यावेळी संध्या कुलकर्णी, मंदा नेवगी, शकिला कुट्टण्णावर, सुलोचना गावकर, सुनिता तुंबरे, कृष्णावती तोपिनकट्टी, मिनाक्षी दाफडे, अनिता पाटील, एम. एस. राऊत यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.