ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील कोलोनियल पाईपलाईन या सर्वात मोठ्या इंधन वाहतूक करणाऱ्या पाईपलाईन यंत्रणेवर रॅन्समवेअर सायबर हल्ला झाला आहे. त्यानंतर अमेरिकेत तातडीने प्रादेशिक आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
हॅकर्सनी कोलोनियल पाईपलाईन कंपनीच्या 100 जीबी डेटावर नियंत्रण मिळवले आहे. त्यांनी काही कॉम्प्युटर लॉक करत त्यांचा डेटाही लॉक केला आहे. हा डेटा परत करण्यासाठी हॅकर्सनी अमेरिकेकडे पैशाची मागणी केली आहे.
दरम्यान, या सायबर हल्ल्यानंतर पाईपालईनद्वारे होणारी गॅस वाहतूक थांबली आहे. कोलोनियल पाईपलाईनमधून दररोज 25 लाख बॅरल तेल जाते. अमेरिकेच्या ईस्ट कोस्टच्या राज्यांमध्ये डिझेल, गॅस आणि जेट इंधनांची 45 टक्के गरज या पाईपलाईनच्या माध्यमातून पूर्ण होते. आता अमेरीकन सरकारने आणीबाणी लागू केल्यानंतर इंधनाचा पुरवठा पाईपलाईनऐवजी रस्त्यांमार्गे होण्याची शक्यता आहे. तसेच इंधनाचे दरही वाढण्याची शक्यता आहे.