प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे अनेक कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे अनेक रुग्णांचा बळी गेला आहे. मात्र, या कोरोना मृतदेहांवर शनिवार रात्रीपासून पडत असलेल्या संततधार पावसाने अंत्यसंस्कार करणे कठीण झाले होते. त्यामुळे सदाशिवनगर स्मशानभूमीत मृतदेहांच्या रांगा लागल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन काही समाजसेवकांनी येथील जुनी इमारत स्वच्छ करून त्या ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.
रविवारी 15 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास जागा अपुरी पडत असल्याचे लक्षात येताच येथील स्मशानभूमीतील जुनी इमारत स्वच्छ करण्यात आली. शनिवार रात्रीपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे मृतदेहांवर अंत्यविधी करण्यास व्यत्यय येत होता. यावेळी समाज सेवक सुरेंद्र अनगोळकर, शंकर पाटील, अभिजित चव्हाण, विनायक पवार, ओमकार बिडकर, शिवम हुलजी, प्रथमेश बिडीकर यांनी महापालिकेचा कर्मचाऱयांची परवानगी घेऊन सदाशिवनगर स्मशानभूमीतील जुनी इमारत स्वच्छ करून कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी केले.