ऑनलाईन टीम / लखनऊ :
योगी सरकारने कोरोना लस खरेदी करण्यासाठी जारी केलेल्या जागतिक निविदेच्या अटी शिथिल केल्या आहेत.
उत्तरप्रदेश सरकारने 7 मे रोजी कोरोना लस खरेदी करण्यासाठी जागतिक निविदा सादर केली होती. या निविदेसाठी कंपन्यांना 16 कोटी रुपये हमी रकमेची अट घालण्यात आली होती. तर दुसरीकडे, 2 ते 8 अंश सेंटिग्रेड तापमानावर साठवता येईल, अशा लसींना प्राधान्य दिले होते.
त्यानंतर 12 मे रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत लस उत्पादक कंपन्यांनी उच्च हमी रक्कम आणि लस साठवण्यासाठी किमान मार्गदर्शक तत्त्वे यामुळे निविदा भरण्यात अडचणी आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर योगी सरकारने कोरोना लसीसाठी जारी केलेल्या जागतिक निविदेच्या अटींमध्ये बदल करून हमी रक्कम 16 कोटींऐवजी 8 कोटी केली आहे. याशिवाय लसीच्या साठवणुकीची किमान अटही कमी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीला फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, सिरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक, झायड्स कॅडिला आणि डॉ. रेड्डीज लॅबचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत प्रतिनिधींनी निविदा अटींबद्दल भाष्य केले होते. तेव्हा या अटी शिथिल करण्यात आल्या. यामुळे फायझर, मॉडर्ना, कॅडिला सारख्या कंपन्यांनाही या निविदेत सामील होता येईल.