बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. राज्यात १० मेपासून सर्वत्र याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. यासाठी राज्यसरकारने नियमावली जाहीर केली आहे. दरम्यान जाहीर झालेल्या लॉकडाऊनचे बेंगळूरमध्ये बहुतांशी नागरिकांनी पालन केले आहे. परंतु काही नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर बेंगळूर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच १ हजाराहून अधिक वाहने जप्त केली आहेत.
बेंगळूर शहर पोलिसांनी (बीसीपी) मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली गुरुवारी सकाळी १० ते संध्याकाळी ८ या वेळेत शहरातील विविध भागातून १,२०५ वाहने जप्त केली आहेत. त्यामुळे जर कोणी शहरात विनाकारण फिरणाऱ असेल तर त्याला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवार व रविवार रोजी शहरभर तपासणी दरम्यान १०७४ दुचाकी, ६४ तीनचाकी आणि ६७ चारचाकी जप्त करण्यात आल्या. दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम (एनडीएमए) च्या संबंधित कलमांतर्गत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.