वार्ताहर/ अथणी
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढला आहे. तो नियंत्रित करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केल्याने बहुतांश नागरिक घरी थांबून आहेत. मात्र संसर्ग रोखण्यासाठीची जबाबदारी पेलत वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, पत्रकार हे आजही घराबाहेर फिरुन आपले कर्तव्य पार पाडत आहेत. या कोरोना योद्धय़ांसाठी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे पुत्र चिदानंद सवदी व त्यांच्या मित्र मंडळाच्यावतीने जेवणाची व पाण्याची सोय करुन देण्यात येत आहे.
सध्या या भागात कोरोनाचे मोठे संकट आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्वजण घरात असले तरी कोरोना योद्धे मात्र घरी न थांबता दररोज आपले कर्तव्य निभावण्यासाठी कार्यक्षेत्रावर हजर आहेत. अनेक कोरोना योद्धय़ांना घरी जेवाय जाण्यासाठीही वेळ मिळत नाही. शिवाय अनेक कोरोना योद्धे कुटुंबियांच्या काळजीने घरी जाणे टाळत आहेत. अशा कोरोना योद्धय़ांच्या जेवणाची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्याच्या जाणीवेतून आपण हे कार्य करत असल्याचे चिदानंद सवदी यांनी सांगितले. कोरोना योद्धय़ांबरोबरच कोरोनाग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनाही जेवण देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी स्वप्नील आठळी, सचिन बुर्ली, अल्ताफ गड्डेकर, संतोष सावडकर आदी उपस्थित होते.