मडगाव आरोग्य केंद्रातील फार्मा कामगारांचे लसीकरण बंद : गोवा फॉरवर्डचे फातोर्डा गटाध्यक्ष पीटर फर्नांडिस यांनी दिलेली माहिती
प्रतिनिधी / मडगाव
सरकारचे डोळे उघडण्यासाठी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांना प्रत्यक्ष जागी जाऊन जाब विचारावा लागला. त्यानंतरच सरकारला जाग आली. शनिवारी मडगाव आरोग्य केंद्रात फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधील कामगारांचे मोठय़ा प्रमाणात लसीकरण करण्यात येत असल्याने आमदार सरदेसाई यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर रविवारी सरकारने या फार्मा कामगारांचे लसीकरण बंद ठेवल्याची माहिती गोवा फॉरवर्डचे फातोर्डा गटाध्यक्ष पीटर फर्नांडिस यांनी दिली.
फातोर्डा येथील पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रवींद्र नाईक व निमिशा फालेरो उपस्थित होत्या. यापूर्वी रवींद्र भवन येथील कार्यक्रमासंदर्भात आमच्या आमदाराला हस्तक्षेप करावा लागला व नंतर सरकारचे डोळे उघडले व रवींद्र भवनसह अन्य सर्व ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्यात आले याकडे फर्नांडिस यांनी लक्ष वेधले.
दादागिरीचा प्रश्नच येत नाही
माजी आमदार दामोदर नाईक यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आमदार सरदेसाई दादागिरी करत असल्याचा आरोप केला होता. त्यांना त्याचे उत्तर लसीकरण रद्द झाल्याने मिळाले असेल. आमचे नेते सरदेसाई यांनी फार्मा कामगारांचे वेर्णा येथे ते काम करत असलेल्या ठिकाणी मोहीम राबवून लसीकरण करावे अशी मागणी केली होती. यात दादागिरीचा प्रश्न येत नाही. आरोग्य केंद्रावर गर्दी होत असल्याने मडगाव आणि फातोर्डातील स्थानिक लोकांना त्याचा फटका बसत असल्याचे सरदेसाई यांनी नजरेस आणून दिले होते, याकडे नगरसेवक नाईक यांनी लक्ष वेधले.
माजी आमदार नाईक यांनी आधी सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच नंतर प्रतिक्रिया द्यावी, असा सल्ला नगरसेविका फालेरो यांनी दिला. लसीकरण मतदान बूथ स्तरावर करण्याची सूचना आमदार सरदेसाई यांनी केली होती. पक्षाचे गोंयकार घर हे कार्यालय लसीकरण केंद्र करण्यास देण्याची तयारी दाखविली होती. मात्र सरदेसाई यांना श्रेय जाईल यासाठी याकडे सरकारने जाणूनबुजून दुर्लक्ष केले. सरदेसाई यांनी स्टेडियमवर कोविड निगा केंद्र स्थापन करण्यासाठी पालिकेमार्फत प्रयत्न केले आहेत. आवश्यक पायाभूत सुविधा तयार आहेत. मात्र सरकारने डॉक्टर व परिचारिका पुरवून आवश्यक मंजुरी दिल्याशिवाय ते सुरू करणे शक्मय नाही. कारण एखादेवेळी आम्ही डॉक्टर नियुक्त करून ते सुरू केले व रुग्णाबाबत एखादी विपरित घटना या निगा केंद्रात घडली तर आम्हाला दोष देण्यात येईल, हे फर्नांडिस यांनी नजरेस आणून दिले व माजी आमदार नाईक यांनी वरचेवर विधाने करण्याऐवजी उपजिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱयांकडून आधी माहिती जाणून घ्यावी, असा सल्ला दिला.
दामू नाईक यांना परप्रांतियांचा जास्त पुळका का ?
स्थानिक फातोर्डावासीय सोडून माजी आमदार नाईक यांना परप्रांतियांचा जास्त पुळका का, असा सवाल नगरसेवक नाईक यांनी केला. यातील काही जण फातोर्डात वास्तव्य करत असल्याचे ते सांगत होते. त्यामुळे यामागे व्हॉटबँक राजकारण ते करत आहेत काय की, त्यांना अलीकडे परप्रांतियांचे घोडे उचलून धरण्यासाठी हातावर काही पडत असल्याने परप्रांतियांच्या विरोधातील कृती खुपत आहे, असा उपहासात्मक सवाल नाईक यांनी उपस्थित केला.