दोन महिन्यांपासून अनेकांची पेन्शन रखडली : लॉकडाऊनमध्ये इतरांकडे हात पसरण्याची वेळ
प्रतिनिधी / बेळगाव
एकीकडे राज्य सरकारकडून लॉकडाऊनसाठी पॅकेजची खैरात केली जात असताना दुसरीकडे मात्र मागील दोन महिन्यांपासून पेन्शन जमा न झाल्याने परवड सुरू झाली आहे. दिव्यांग, विधवा, वृद्ध, गतिमंद, विशेष मुलांना सरकारकडून देण्यात येत असलेली पेन्शन दोन महिन्यांपासून बंद आहे. काही जणांची जमा झाली असली तरी अद्याप अनेकांची जमा न झाल्याने बँका तसेच पोस्ट कार्यालयात जावून विचारणा करणाऱयांची संख्या वाढली आहे. आधीच लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प असल्याने हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर असल्याने पेन्शन लवकर जमा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दिव्यांग, वृद्ध, विधवा यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यावर अथवा पोस्ट कार्यालयात पेन्शन जमा होते. या व्यक्ती बँक तसेच पोस्टमध्ये जावून पेन्शनवर आपला उदरनिर्वाह चालवितात. परंतु मागील दोन महिन्यांपासून टेझरी कार्यालयातून पेन्शन जमा करण्यात आलेली नसल्याने ती जमा झाली की नाही हे पाहण्यासाठी पेन्शनधारक हेलपाटे मारीत आहेत. महिन्याला तुटपुंजी पेन्शन मिळत असली तरी ती उदरनिर्वाह चालविण्यासाठी महत्त्वाची ठरते.
वेळेत पेन्शन जमा करण्याची मागणी
प्रत्येक महिन्याला 700 रुपयांपासून ते 1400 रुपयांपर्यंत प्रतवारीनुसार पेन्शन जमा केली जाते. मागील काही वर्षांपासून दोन महिन्यांची पेन्शन एकाच वेळी जमा केली जात आहे. यामुळे आर्थिक खर्च करणे डोकेदुखीचे ठरत असल्याने वेळच्या वेळी पेन्शन जमा करण्याची मागणी होत आहे. वृद्ध व्यक्ती तर पेन्शन जमा झाली का हे पाहण्यासाठी बँक तसेच पोस्टाच्या खेटा मारत असल्याचे दिसत आहे.
दिव्यांगांना विशेष पॅकेज जाहीर करा
लॉकडाऊनमुळे दिव्यांगांची अवस्था बिकट झाली आहे. व्यवसाय-नोकरी नसल्याने उपासमारीची वेळ येत आहे. त्यातच सरकारकडून प्रत्येक महिन्याला जमा होणारी पेन्शनदेखील मागील दोन महिन्यांपासून देण्यात आलेली नाही. त्यामुळे दिव्यांगांचे हाल होत असून त्यांनाही विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
-गिरीष सव्वाशेरी(सेपेटरी-हॅण्डीकॅप्ड असोसिएशन, बेळगाव)