ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पोस्ट कोविड रुग्णांमध्ये आढळणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराने आता देशभरात थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. आज सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशातील 18 राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे 5,424 रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यातील 55 टक्के रुग्णांना मधुमेह आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी यासंदर्भात माहिती दिली.
डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, देशातील 18 राज्यात म्युकरमायकोसिसचे 5,424 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, आंध्रप्रदेश आणि गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. एकूण 5424 रुग्णांपैकी 55 टक्के रुग्णांना मधुमेह आहे. त्यामुळे साखरेचं प्रमाण नियंत्रणात नसलेल्या आणि मधुमेह असलेल्या लोकांना या आजाराचा धोका जास्त आहे.
दरम्यान, ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे. तसेच शुगर लेव्हल 700 ते 800 पर्यंत पोहोचते, अशा रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका अधिक असल्याचे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे.