प्रतिनिधी / नागठाणे :
देशमुखनगर (ता.सातारा) येथील चोरून सुरू असलेल्या दारू विक्री अड्डयावर बोरगाव पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी तेथून ५४,७२० रुपये किमतीचे देशी दारूचे १९ बॉक्स जप्त केले. याप्रकरणी शकीला गुलाब मुलाणी (वय.६२) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी सायंकाळी देशमुखनगर येथे महिला चोरून दारूविक्री करत असल्याची माहिती सपोनि डॉ.सागर वाघ यांना मिळाली.या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार राजू शिखरे,उत्तम गायकवाड,अमित पवार, महिला पोलीस तेजस्विनी जाधव व चालक धनंजय जाधव हे देशमुखनगर येथे पोहचले. यावेळी रस्त्यालगत असलेल्या नावाबसाहेब चिकन शॉपजवळ एक महिला बॉक्स घेऊन बसलेली आढळली. पोलिसांनी बॉक्स तपासला असता त्यात देशी दारूच्या बाटल्या आढळल्या.
यावेळी पोलिसांनी चिकन सेंटरची झडती घेतली असता त्यांना पलंगाखाली कपड्याने झाकून ठेवलेले आणखी १८ देशी दारूचे बॉक्स आढळले. पोलिसांनी या १९ बॉक्समधील ५४,७२० रुपये किंमतीच्या ९१२ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.पोलिसांनी शकीला गुलाब मुलाणी हिच्याविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.