अनेक स्वीमिंग पूल सर्वांनी पाहिले असतील, पण लंडनमध्ये आकाशात तरंगणा पारदर्शक स्वीमिंग पूल अत्यंत खास आहे. दोन गगनचुंबी इमारतींदरम्यान 115 फुटांच्या उंचीवरील स्काय पूल 19 मे रोजी लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यानंतर ट्विटरवर या स्वीमिंग पूलच्या चित्रफिती मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहेत.
दक्षिण-पश्चिम लंडनच्या वॉक्सहॉलच्या एम्बसी गार्डनच्या इमारतींदरम्यान हा स्काय पूल आहे. पूर्णपणे पारदर्शक 5 मीटर रुंद आणि 3 मीटर खोलीचा इन्फिनिट पूल अत्यंत आकर्षक आहे. या पूलमध्ये एम्बसी गार्डनच्या सदनिकांमध्ये राहणाऱयांना तसेच पाहुण्यांनाच प्रवेश करण्याची अनुमती आहे.
या स्कायपूलमध्ये पोहण्ण्याचा आनंद घेण्यासह लोकांनी तेथील अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. या स्वीमिंग पूलमधून लंडन आय आणि संसदेचे मोहक दृश्यही दिसून येते.
या स्वीमिंग पूलमध्ये उडी घेताना एखाद्या इमारतीतून उडी घेत असल्याचे वाटते. येथे लोक पोहतेवेळी आकर्षक दृश्यांचा आनंद घेऊ शकतात. तर खालून पाहिल्यास पूलाच्या आतील दृश्य अत्यंत आकर्षक दिसून येते.
एम्बसी गार्डनमध्ये दोन बेडरुमच्या अपार्टमेंटची किंमत 1 दशलक्ष पौंडपेक्षाही अधिक आहे. काही घरे उपलब्ध असून त्यांचे दर 6 लाख पौंडपासून सुरू होतात. एम्बसी गार्डनमध्ये 2 हजार आलिशान होम अपार्टमेंट, एक रिटेल स्पेस, ऑफिस स्पेस, रेस्टॉरंट आणि लँडस्केप गार्डन सामील आहे. तर स्काय पूल प्रमुख आकर्षण आहे. येथे स्पा सुविधाही उपलब्ध आहे. लक्झरी अपार्टमेंटमध्ये राहणाऱया लोकांकडे एक खासगी चित्रपटगृह, इनडोअर पूल आणि जिम देखील आहे.