वृत्तसंस्था/ पोर्टो ऍलीग्रे
2022 साली कतारमध्ये होणाऱया फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी सुरू असलेल्या दक्षिण अमेरिका संघाच्या राऊंड रॉबिन पात्र फेरीच्या स्पर्धेत शुक्रवार ब्राझीलने इक्वेडोरचा 2-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या विजयामुळे ब्राझील संघाने या स्पर्धेत 15 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले. अर्जेंटिना 11 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. कतारमधील होणाऱया विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत चार संघांना थेट प्रवेश दिला जाणार असल्याने ब्राझील संघाचा यामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारचा ब्राझील-इक्वेडोर यांच्यातील सामना सुमारे पहिल्या 60 मिनिटांच्या कालावधीत अत्यंत चुरशीचा झाला. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. 65 व्या मिनिटाला रिचार्लीसनने ब्राझीलचे खाते उघडले. हुकमी खेळाडू नेमारने सामन्यातील जादावेळेत पेनल्टी स्पॉटवरून ब्राझीलचा दुसरा गोल नोंदवून इक्वेडोरचे आव्हान संपुष्टात आणले. या विजयामुळे दक्षिण अमेरिकन संघाच्या पात्र फेरीच्या या स्पर्धेत ब्राझीलचा हा सलग पाचवा विजय आहे. बलाढय़ अर्जेंटिना 11 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे.
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद ब्राझीलला मिळाले आहे. दरम्यान कोरोना महामारीमुळे सदर स्पर्धा ब्राझीलमध्ये घेतली जावू नये यासाठी खेळाडूंमध्ये मतभेद दिसून येत आहेत. ब्राझीलच्या अनेक फुटबॉलपटूंनी या स्पर्धेत सहभागी न होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी ब्राझीलमध्ये कोरोनाच्या लाटेमध्ये प्रत्येक दिवशी हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत या महामारीत ब्राझील देशामध्ये किमान 470,000 लोकांचे बळी पडले आहेत.
शुक्रवारच्या सामन्यानंतर ब्राझील संघाचे प्रशिक्षक टिटे यांनी पत्रकार परिषद घेतली. कोपा अमेरिका स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टिटे प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. दरम्यान प्रशिक्षक टिटे यांनी ब्राझील फुटबॉल कॉन्फडरेशनचे अध्यक्ष रॉजिरिओ केबोक्लो यांच्याशी आपण या प्रश्नावर चर्चा केली असल्याचे सांगितले.
येत्या मंगळवारी ब्राझील आणि पराग्वे यांच्यातील होणाऱया सामन्यानंतर ब्राझीलच्या फुटबॉल कॉन्फडरेशनकडून कोपो अमेरिका फुटबॉल स्पर्धा संदर्भात अंतिम उत्तर मिळेल, अशी अपेक्षा आहे. कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धा यापूर्वी कोलंबिया आणि अर्जेंटिना यांच्या संयुक्त यजमानपदाने भरविली जाणार होती पण दोन आठवडय़ापूर्वी कोलंबियाने देशातील परिस्थिती अस्थिर असल्याने आपण ही स्पर्धा भरवू शकत नाही, असे जाहीर केले तर गेल्या आठवडय़ात कोरोना महामारीमुळे अर्जेंटिनातील परिस्थिती नाजूक झाल्याने आर्जेंटिनाने या स्पर्धेचे यजमानपद नाकारले होते. आता ही स्पर्धा ब्राझीलमध्ये भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोपा अमेरिका स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय ब्राझीलच्या अनेक फुटबॉलपटूंनी घेतला आहे.