वृत्तसंस्था/ गोयानिया
कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात पराग्वेने बोलिव्हियाचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत बोलिव्हियाने आघाडी घेतली होती. पण उत्तरार्धात पराग्वेने तीन गोल नोंदवून विजय हस्तगत केला. या सामन्यात मध्यंतराला काही मिनिटे बाकी असताना बोलिव्हिया संघाला 10 खेळाडूंनिशी खेळावे लागले.
या सामन्यासाठी बोलिव्हिया संघात कोरोनाची बाधा झाल्याने पाच हुकमी फुटबॉलपटूंचा समावेश नव्हता. त्यामध्ये स्ट्रायकर, मार्टिन्सचा समावेश होता. बोलिव्हियाच्या गेल्या सात सामन्यामध्ये मार्टिन्सने सात गोल नोंदविले होते. कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत 1963 पासून बोलिव्हियाला पराग्वेचा पराभव करता आलेला नाही.
सोमवारच्या सामन्यात 10 व्या मिनिटाला बोलिव्हियाने पेनल्टी स्पॉटवरून आपले खाते उघडले. बोलिव्हियाचा हा एकमेव गोल सॅव्हेड्राने नोंदविला. पूर्वार्धात पराग्वेला पेनल्टीची संधी मिळाली होती. पण त्यांना गोल करता आला नाही. पराग्वे संघातील केकुने मारलेला फटका गोलपोस्टच्या बाहेरून गेला. बोलिव्हिया संघातील आघाडी फळीत खेळणाऱया क्युलेरला पंचांनी दुसऱयांदा पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढल्याने या संघाला शेवटपर्यंत दहा खेळाडूनिशी खेळ करावा लागला.
सामन्याच्या उत्तरार्धात पराग्वेने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडविले. 62 व्या मिनिटाला पराग्वेचे खाते केकुने उघडले. 65 व्या मिनिटाला अँजेल रोमेरोने पराग्वेचा दुसरा गोल केला. सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना पराग्वेचा तिसरा गोल नोंदविला गेला. या स्पर्धेत पराग्वेचा संघ या विजयामुळे अ गटात आघाडीवर आहे. अर्जेंटिना आणि चिली यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिल्याने हे दोन्ही संघ पराग्वेच्या मागे आहेत.