बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मुत्नाळ गावाशी सलग्न असलेल्या श्रीक्षेत्र कांचनश्रुती अहिंसा क्षेत्रात नुकतीच भगवान श्री बाहुबली यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. भगवान बाहुबलींच्या मूर्ती कर्नाटकातील श्रवणबेळगोळ, कार्कळ, धर्मस्थळ, वेणूर, गोम्मटगिरी, कनकगिरी येथे स्थापना करण्यात आल्या आहेत. उत्तर कर्नाटकात आणि दक्षिण महाराष्ट्रात अशा मूर्ती उभारल्या गेल्या नाहीत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमांना लागून असलेल्या बेळगाव तालुक्यातील मुत्नाळ गावच्या परिसरात बाहुबलींची मूर्ती बसविण्यात आल्याने या भागातील जैन समाजात आनंदाचे वातावरण आहे. बेंगळूर येथील बी. एस. नेमेशा आणि जी. एन. मीना यांची एकुलती एक कन्या बी. एन. निश्मिता यांना तरुण वयातच त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ बाहुबलींची मूर्ती उभारण्याचा संकल्प करण्यात आला.
बाहुबलांची मूर्ती उभारण्यासाठी प. पू. कांचश्री माताजी, संस्थेचे अध्यक्ष पारेश हुक्केरी, संचिव राजेंद्र पाटील यांनी सहकार्य केले. मुत्नाळ गावात बसविण्यात आलेली बाहुबलींची मूर्ती बिडदी जवळ बनविण्यात आली आहे. 21 फूट उंचीची ही मूर्ती अशोक गुडीगाराने साकारली आहे. या मूर्तीचे वजन अंदाजे 40 टन आहे. या मूर्तीचा पंचकल्याण महोत्सव आणि भगवान बाहुबली मस्तकाभिषेक कार्यक्रम 13 ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. या पंचकल्याण महोत्सव आणि भगवान बाहुबली मस्तकाभिषेक कार्यक्रमाचा सर्व खर्च बी. एस. नेमेशा आणि जी. एन. मिना यांनी उचलला असल्याचे अध्यक्ष पारेश हुक्केरी यांनी सांगितले.