दागिने, किंमती कपडे, रोखीसह कॅमेराही लंपास
प्रतिनिधी /मडगाव
लग्न समारंभाच्या निमित्ताने घरात कोणीही नसल्याची संधी घेऊन चोरटय़ांनी रावणफोंड-नावेली येथील एक बंगला फोडून सुमारे 20 लाखांचा ऐवज लंपास केला. पोलिसांच्या (सुरवातीच्या) अंदाजाप्रमाणे हा आकडा अंदाजे 12 लाखांचा आहे. एकूण ऐवजाची खातरजमा करण्यासाठी तपास यंत्रणेने संबंधितांना दागिन्यांची बिले सादर करण्यास कळविलेले आहे.
प्राप्त माहितीनुसार असिफ शेख यांचा मलकीचा हा बंगला फोडून ही चोरी करण्यात आली आहे. असिफ शेख यांच्या घरात लग्न समारंभ होता. लग्न समारंभानंतर रिसेप्शन सोहळा होता. लग्न समारंभाच्यावेळी संबंधीत मंडळीनी दागदागिने अंगावर घातलेले होते. मात्र रिसेप्शनच्यावेळी अंगावरील दागदागिने ब्ंागल्यातच ठेवलेले होते असा तक्रारदाराने दावा केला असल्याची माहिती पोलीस सुत्रानी दिली.
रिसेप्शनला गेल्यावेळी बंगल्यात चोरी
रिसेप्शनसाठी या बंगल्यातील मंडळी रविवारी सायंकाळी बंगल्यातून बाहेर गेली होती. मध्यरात्रीच्या सुमाराला ही मंडळी बंगल्यावर परतली तेव्हा बंगल्यात चोरी झाल्याचे घरच्या मंडळींच्या लक्षात आले.
सर्व कपाटांमध्ये केली शोधाशोध
पोलीस तपासात असे दिसून आले आहे की चोरटय़ांनी बाथरुमच्या खिडकीचे ग्रील्स काढून आत प्रवेश केलेला आहे. बंगल्यातील बहुतेक सर्व कपाटे चोरटय़ांनी खोलली होती. कपाटे खोलल्यानंतर कपाटातील सर्व कपडे इतस्ततः विखुरलेले होते. किमती ऐवज कोठे ठेवलेला आहे याचा शोध घेत असताना चोरटय़ांनी कपाटातील हे कपडे बाहेर काढलेले असावेत असा अंदाज तपास यंत्रणेने व्यक्त केला.
दागिने, कपडे, रोखीसह कॅमेराही लंपास
कपाटात ठेवलेले लाखो रुपयांचे दागिने चोरटय़ांच्या हाती लागल्यानंतर चोरटय़ांनी नवरा व नवरीचे लग्नाचे किमती कपडेही पळविल्याची माहिती हाती आली आहे. कपाटात सुमारे दीड लाख रुपयांची रोख रक्कम होती. दागिन्याबरोबर चोरटय़ांनी ही रक्कम आणि एक किंमती कॅमेराही लंपास केल्याचे समजते.
चोरटय़ांनी टीव्हीवर लिहिले ‘आय लव्ह यू’
या बंगल्यात चोरी करुन जाताना चोरटय़ांनी बंगल्यातील टीव्हीवर ‘आय लव्ह यु’ असे इंग्रजी वाक्य लिहिलेले होते. या बंगल्यातील या चोरीचा तपास लावण्यासाठी ‘आय लव्ह यु’ या वाक्याचा, तपास यंत्रणेला बराच उपयोग होणार असल्याची माहिती पोलीस सुत्रानी दिली. ‘आय लव्ह यु’ या वाक्याचे विश्लेषण करण्यात येईल तेव्हा या चोरीप्रकरणामागे एखादी प्रेम कथा नसावी ना या दिशेनेही आता तपास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर एका पक्षकाराला बरोबर घेऊन तपास यंत्रणा ‘आय लव्ह यु’ चा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या प्रयत्नात तपास यंत्रणेला यश आले तर या चोरी प्रकरणाचा छडाही लागण्याची शक्यता सुत्रानी नाकारलेली नाही.
ठसेतज्ञाकडून तपासणी
या चोरीप्रकरणासंबंधी ठसेतज्ञ घटनास्थळी येऊन त्यांनीही संशयित आरोपींचे ज्या ज्या जागी ठसे मिळण्याची शक्यता आहे त्या त्या जागी लक्ष केंद्रीत केलेले असून या चोरीचा तपास लावण्यासाठी तपास यंत्रणेने कंबर कसलेली आहे. नक्की किती लाखांचे दागिने लंपास करण्यात आलेले आहे त्याची खातरजमा करण्यासाठी तपास यंत्रणेने संबंधितांना दागिन्यांची बिले सादर करण्यास कळविलेले आहे.