नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अनेक नित्योपयोगी औषधांच्या बनावट आवृत्त्या बाजारात पोहचल्या आहेत, असा इशारा केंद्र सरकारच्या औषध महानियंत्रकानी दिला आहे. यांमध्ये वेगवेगळय़ा रोगांवर आणि व्याधींवर दिल्या जाणाऱया औषधांचा समावेश आहे. अलर्जीविरोधी माँटेयर, हृदयविकारविरोधी औषध ऍटोर्व्हा, स्टॅटिन औषध रोझडे, वेदनाशामक झीरोडोल, सुटय़ा कॅल्शियम गोळय़ा आणि ड जीवनसत्व गोळय़ांचा समावेश आहे. इतर औषधेही मोठय़ा प्रमाणात समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
केंद्रीय औषध महानियंत्रकांनी हा इशारा एका नोटीसीद्वारे राज्यांच्या औषध निरीक्षकांना दिला आहे. बनावट औषधांची निर्मिती आणि व्यापाराविरोधात वेगवान आणि कठोर कारवाई करा अशी सूचना सर्व राज्यांच्या औषध निरीक्षकांना करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशच्या औषध निरीक्षकांनी केलेल्या तक्रारीवरुन हा दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गांबिया आणि उझबेकिस्तान या देशांमध्ये भारतीय औषधांमुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यांना अनुलक्षून केंद्र सरकारकडून बनावट आणि भेसळयुक्त औषधांविरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. अनेक स्थानी छापे टाकण्यात आले आहेत.