कोल्हापूर/प्रतिनिधी
मुंबई, पुणे, सोलापूर येथे आश्रयास असणारे राज्यासह देशातील मोस्ट वाँटेड गुंड व त्यांच्या टोळ्या सध्या कोल्हापुरात आ़श्रयाला येत आहेत. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, हरियाणा, बिहारसह देशातील अनेक मोठे गुंड व त्यांच्या टोळ्यांना कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. कोल्हापूर पोलिसांची ही कारवाई नक्कीच धाडसी असली तरी हे गुंड कोल्हापूरात येऊन आपले बस्तान का बसवत आहेत. त्यांचे कोल्हापुरात असणारे रॅकेट नष्ट करण्याचे आव्हान मात्र कोल्हापूर पोलिसांसमोर कायम आहे.
कोल्हापूर जिह्यात फौंड्री, बांधकाम, यासह विविध उद्योग मोठय़ा प्रमाणात आहेत. कोल्हापूर जिह्यात 9 एमआयडीसी आहेत. यामध्ये परराज्यातील कामगार काम करतात. याशिवाय गुजरीत दागिन्यांवर कलाकुसर करण्यासाठी अनेक बंगाली, राजस्थानी कारागीर काम करतात. तसेच बांधकाम व्यवसायामध्ये परराज्यातील कामगारांची वाढ होत आहे. या सगळ्यांना शहरातील सानेगुरुजी, आपटेनगर, कळंबा, आर.के.नगर, पाचगांव या उपनगरांसह गांधीनगर, शिरोली, उंचगांव या ठिकाणी सहज आणि सवलतीमध्ये आश्रय मिळू लागला आहे. या परराज्यातील कामगारांच्या आडून कोल्हापुरात मोस्ट वाँटेड गँगस्टर व त्यांच्या पंटरांचे राहणीमान वाढू लागले आहे.
गॅगस्टर हब ओळख
यापूर्वीही पंजाब, हरियाणासह इतर राज्यातील पोलिसांनी कोल्हापुरात कारवाया केल्या आहेत. त्या त्या राज्यांमध्ये गुन्हे करुन पसार झालेल्या खतरनाक गुन्हेगारांना कोल्हापुरात आश्रयाला येत आहेत. तसेच कोल्हापुरात सध्या पिस्तुल, हत्यार मिळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बिहार, झारखंड तसेच राजस्थान येथून हे देसी कट्टे येत असल्याचे समोर आले आहे.
ही आहेत कारणे
कोल्हापूर पासून मुंबई, पुणे, कर्नाटक, कोकण, गोवा कनेक्टिव्हिटी
एसटी., ट्रव्हल्स, रेल्वे, विमानाची उपलब्धता
परराज्यातील कामगार, पैलवानांचा मोठा वावर
कळंबा जेलमुळे स्थानिक गुन्हेगारांशी मैत्री
जिह्यात दुर्गम भाग मोठय़ा प्रमाणात
स्थानिक गुन्हेगारांचे वाढते नेटवर्क
कोल्हापुरातून अंगडिया, हवाला, तसेच मटका रॅकेट मोठय़ा प्रमाणात
कोल्हापुरातील गुजरी प्रसिद्ध आहे, सधन आहे.
हे आहेत उपाय
प्रत्येक परराज्यातील कामगाराची पोलीस स्टेशनला नोंद होणे गरजेचे,
घरमालक, कंत्राटदारांनी पुढाकार घेणे आवश्यक
स्थानिक गुंडाची वारंवार चौकशी, त्यांच्यावर शॅडो वॉच आवश्यक
प्रत्येक तालमीत येणाऱया पैलावानांची नोंद होणे गरजेचे
कारागृहात स्थानिक गुंडासाठी स्वतंत्र्य बराक ठेवणे आवश्यक
गेल्या वर्षभरात या गँगवर झाली कारवाई
बिष्नोई टोळी किनी टोल नाका येथे कारवाई
हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मोस्ट वॉंटेड गुन्हेगार पपला गुर्जर याला गांधीनगर येथून अटक
वाघोला गुजराथ येथील दरोडेखोर प्रवीण धीराजी याला मुंबई पोलिसांनी कोल्हापुरातून अटक केली.
तामिळनाडू येथील गुन्हेगारांना कागल येथे जेरबंद करण्यात आले.
डेराबसी (मोहाली राज्य पंजाब) येथील झगलान गँगच्या 4 जण जेरबंद
लॉरेन्स बिष्नोई, कॅनडा येथील गोल्डी ब्रार टोळीचा मोस्ट वाँटेड सदस्य मोहित मलीक रंकाळा येथून जेरबंद
सातारा येथे मर्डर करुन पसार झालेले दोन केरळ मधील आरोपी मध्यवर्ती बस स्थानक येथून जेरबंद
हरियाणा येथे खून करुन पसार झालेले 5 जण कोगनोळी नाक्यावर जेरबंद
मध्यप्रदेश, गुजरात येथील सराईत चोरटय़ांना राजारामपुरी, राजवाडा पोलिसांकडून अटक