ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याजवळ शिवशाही बस आणि कंटेनरच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील चालक, वाहकासह सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुणे-सासवड रस्त्यावर असलेल्या उरळी देवाची गावालगत मध्यरात्री हा अपघात झाला.
संजय एकनाथ भायदे (रा. मुरुड, वय 52 वर्षे) असं अपघातातील मृताचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री पुणे-सासवड रस्त्यावरुन शिवशाही बस (MH14 GO 3104) पंढरपूरहून प्रवाशांना घेऊन पुण्याच्या दिशेने येत होती. ही बस उरळी देवाची गावालगत आली असता सासवडहून पुण्याच्या दिशेने निघालेला एक कंटनेर (MH18 AA 7190) बसला समोरुन आडवा आला. त्यामुळे शिवशाही आणि कंटेनरमध्ये जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता कंटेनर आणि शिवशाही बसच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर बस चालक, वाहकासह 6 जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतलं. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अधिक वाचा : मान्सूनचा परतीचा प्रवास येत्या तीन दिवसांत सुरू होणार
अपघातानंतर उरुळी देवाची फाटय़ाजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने हटवल्यानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्यात आली.