पुणे / वार्ताहर :
मित्र-मैत्रिणींसह प्रियेसीवर इम्प्रेशन मारण्यासाठी डिलिव्हरी बॉय चक्क पोलिसाचा डेस घालून नदी पात्राच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर थांबला. मात्र, खऱ्या पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान, संबंधित तोतया पोलीस असल्याचा संशय आला. त्यांनी त्याची चौकशी केली असता तो गडबडला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली असता त्याचे बिंग फुटले. पोलिसांनी या तोतयाला अटक केली आहे.
यशवंत रमेश धुरी (वय 30, रा. तापकीरनगर, काळेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार श्रीकांत किसन वाघवले (वय 43) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक एस महाडिक आणि पोलीस नाईक एन मुळे यांच्यासोबत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान, त्यांना औंध परिसरात राम नदीच्या पुलावर नागरस रोड या ठिकाणी तोतया पोलीस खाकी डेस घालून उभा असलेला दिसला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या जवळ जाऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने औंध पोलीस चौकीत नेमणुकीस असल्याचे सांगितले. त्याने ड्रेस पोलिसाचा घातला असला तरी त्याच्या पायात चप्पल होती आणि टोपीवर पिंपरी-चिंचवड पोलीस असे लिहिले होते. त्यामुळे तो तोतया असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याची सखोल चौकशी केली असता त्याचे बिंग फुटले. मित्र-मैत्रिणींवर इम्प्रेशन टाकण्यासाठी आपण पोलिसांचा डेस परिधान केल्याचे त्याने यावेळी सांगितले. याबाबत पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.