आमदार अनिल बेनके पुरस्कृत वादन स्पर्धेस प्रारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
आमदार अनिल बेनके पुरस्कृत दसरा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांतर्गत भव्य आंतरराज्य ढोलताशा वादन स्पर्धेस शुक्रवारी मोठय़ा उत्साहाने प्रारंभ झाला. आमदार अनिल बेनके व मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
दि. 7 ते 9 ऑक्टोबर अशी 3 दिवस ही स्पर्धा चालणार असून, उद्घाटनप्रसंगी वादकांनी अत्यंत चुरशीने ढोलताशा वादनाचे प्रदर्शन केल्याने बेळगावकरांना पारंपरिक वाद्याची मेजवानी लाभली.
स्पर्धेसाठी मैदानावरील व्यासपीठावर ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. आज पहिल्या दिवशी शिवदैवत ढोलताशा पथक तुरमुरी व वक्रतुंड ढोलताशा पथक खानापूर यांचे सादरीकरण झाले. ढोलताशांच्या गजराने संबंध परिसर दणाणून निघाला. स्पर्धेस प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सरदार मैदानावर आयोजित ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी झाली होती.